जिल्ह्यातील गणेश मंदिरे भाविकांनी फुलली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील गणेश मंदिरे भाविकांनी फुलली
जिल्ह्यातील गणेश मंदिरे भाविकांनी फुलली

जिल्ह्यातील गणेश मंदिरे भाविकांनी फुलली

sakal_logo
By

शिरूर, ता. १० : नवीन वर्षातील पहिली आणि सन २०२३ या वर्षातील एकमेव अशा अंगारक संकष्टी चतुर्थीची पर्वणी साधत आज रांजणगाव (ता. शिरूर) येथे आवर्जून हजेरी लावत लाखो भाविकांनी महागणपतीचे दर्शन घेतले. पहाटेपासून सुरू झालेली दर्शन रांग रात्री उशिरापर्यंत ओसंडून वाहत होती. मंदिर परिसरातील रोषणाई, मुख्य सभामंडपावरील झेंडूच्या माळांची सजावट, रंगीबेरंगी सुगंधित फुलांनी सजविलेला गाभारा आणि वस्त्र अलंकारजडीत महागणपतीचे दर्शन यामुळे अवघे रांजणगाव मंगलमय होऊन गेले होते.
श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने भल्या पहाटे महागणपतीस अभिषेक करून शाही वस्त्र व रत्नजडित मुकूटासह सुवर्णालंकार परिधान करण्यात आले. महागणपतीला यावेळी दूर्वा तसेच चाफा आणि गुलमोहराच्या फुलांनी गुंफलेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यामुळे मंगलमूर्तीच्या सुबकतेत आणखीच भर पडली. आरतीनंतर पहाटे पाच वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली होती. जरबेरा, गुलाब, ऑथोरियम, ब्लू डिजी, कामिनी या फुलांच्या कलात्मक सजावटीने आणि धूप-अगरबत्ती व सुवासिक अत्तरांच्या दरवळाने गाभारा सुगंधित झाला होता. दर्शनाबरोबरच महागणपतीचे हे मंगलमय रूप न्याहाळण्यासाठी आणि गाभाऱ्यातील फुलांची कलात्मक सजावट पाहण्यासाठी भक्तगणांची पावले क्षणभर गाभाऱ्यात थबकत होती.
सकाळी दहानंतर गणेश भक्तांची गर्दी उत्तरोत्तर वाढत गेली. दुपारी देवस्थानची महापूजा झाली. यावेळी गणेशभक्तांनी, महागणपतीस १०१ डझन केळीचा महानैवेद्य दाखविला. महापूजेनंतर सभामंडपात महागणपती भजनी मंडळाने गणेशगौरवाची भजने सादर केली. देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, ॲड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशेबनीस संतोष रणपिसे, पुजारी प्रसाद कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी दिवसभर खिचडीचा प्रसाद देण्यात आला. खिचडीबरोबरच महानैवेद्यातील केळीचा प्रसादही वाटण्यात आला.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे व उपनिरीक्षक विनोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष औटी, ब्रह्मानंद पोवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, अंगारक संकष्टीचे औचित्य साधून देवस्थान ट्रस्टने, अष्टविनायक ब्लड बॅंकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यात ५१ गणेशभक्तांनी रक्तदान केले.