तरुणांनी धाडसाने परतविला बिबट्याचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणांनी धाडसाने परतविला बिबट्याचा हल्ला
तरुणांनी धाडसाने परतविला बिबट्याचा हल्ला

तरुणांनी धाडसाने परतविला बिबट्याचा हल्ला

sakal_logo
By

शिरूर, ता. १० : मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच शेतात काम करणाऱ्या तरुणावर हल्ला केला. त्यावेळी त्याच्यासोबत काम करणारा दुसरा तरुण त्याच्या मदतीला धावला व त्याने आपल्याकडील काठीने बिबट्याला मारले. त्यामुळे चवताळलेल्या बिबट्याने त्याच्याकडे मोर्चा वळवला असता जखमी अवस्थेतील तरुणाने त्याच काठीने बिबट्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या या प्रतिकाराने आणि काठीच्या हल्ल्याने गांगरलेल्या बिबट्याने मक्याच्या पिकात धूम ठोकली. आमदाबाद (ता. शिरूर) येथे मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास हा थरार घडला.
बिबट्याच्या हल्ल्यात विकास रतन जाधव (वय ३५) व वैभव मोहन जाधव (वय २८, दोघे रा. आमदाबाद, ता. शिरूर) हे जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ येथील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. आम्ही दोघे मक्याच्या शेतात काम करीत असताना तेथेच दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याचे विकास जाधव व वैभव जाधव यांनी सांगितले. बिबट्याने प्रथम वैभववर मागच्या बाजूने हल्ला केला. बिबट्या त्याची मान पकडण्याच्या प्रयत्नात असतानाच तेथेच काम करणाऱ्या विकासने तेथील खोऱ्याच्या दांडक्याने बिबट्याला मारले. त्यामुळे चवताळलेल्या बिबट्याने वैभवला सोडून विकासकडे मोर्चा वळविला. जीव वाचविण्यासाठी पळताना शेतातील ढेकळांना पाय अडकून पडलेल्या विकासवर बिबट्याने मागील बाजूने झेप घेतली. त्याला पंजात पकडून ओढत असतानाच जखमी अवस्थेतील वैभव याने हिमतीने पुन्हा उठून तेच दांडके उचलून बिबट्यावर हल्ला केला. दांडक्याचे दोन तीन घाव पाठीवर बसताच गांगरलेला बिबट्या विकासला सोडून मक्याच्या शेतात पळून गेला.
भरदिवसा झालेल्या या बिबट्याच्या हल्ल्यामुळे आमदाबाद, माशेरे मळा परिसरात घबराट पसरली. बिबट्याच्या हल्ल्यात दोघांच्याही पाठीला, हाताला, कंबरेला व कानाला गंभीर जखमा झाल्या आहेत. बिबट्याची नखे व दात दोघांनाही लागले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत.