शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके
शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके

शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके

sakal_logo
By

शिरूर, ता. १२ : झांज पथकाचा दणदणाट...पारंपारिक वाद्यांचा गजर...शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके... भगवे फेटे आणि पारंपारिक वेशात सहभागी झालेल्या महिला भगिनी...भगवे झेंडे फडकावित सहभागी झालेले तरुण...अन फुलांच्या पायघड्यांवरून राजमाता जिजाऊ, बालशिवाजी आणि जिजाऊंच्या लेकींचे आगमन...त्यांचे तुतारींच्या निनादात स्वागत... ‘तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ, जय शिवराय’च्या गर्जना करीत जिजाऊ जयंतीनिमित्त शिरूरमध्ये निघालेल्या मिरवणुकीत सर्वधर्मीय नागरिकांबरोबरच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
शिरूर बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्याला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शिरूर तालुकाध्यक्षा ऊर्मिला फलके व शहर अध्यक्षा साधना शितोळे यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर मिरवणुकीला सुरवात झाली. श्री संभाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, शिरूरचे माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा वैजयंती चव्हाण, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजूभाई शेख, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नामदेवराव घावटे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष किरण बनकर आदींसह शहर व परिसरातील विविध पक्षसंघटनांचे कार्यकर्ते व प्रामुख्याने महिला भगिनी या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शोभना पाचंगे पाटील यांनी आभार मानले. पारंपारिक वाद्यांच्या गजरातील ही मिरवणूक जिवंत देखाव्यामुळे व जिजाऊंसह, बालशिवबाच्या पात्रामुळे लक्षवेधी ठरली.
दरम्यान, सकाळी सकल मराठा समाज संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ या संस्थांनी आयोजिलेल्या जयंती सोहळ्यात, राजमाता जिजाऊंना अभिवादन केले. निवासी नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी व पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील यांच्या हस्ते जिजाउंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग थोरात, संपदा पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर डेरे, उद्योजक किरण पठारे पाटील, आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र बापू सानप आदी उपस्थित होते. सकल मराठा संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश धुमाळ यांनी स्वागत केले. संजय बारवकर यांनी आभार मानले. बीजे कॉर्नर येथे झालेल्या जयंती सोहळ्यात जिजाऊ व शिवरायांवरील पोवाडे सादर केले. सचिन जाधव यांनी स्वागत केले.

बालकलाकारांनी वेधले लक्ष
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त शहरातून निघालेल्या मिरवणुकीत जिजाऊ, बालशिवाजी, जिजाऊच्या लेकी आणि मावळ्यांच्या वेशातील बालकलाकारांनी लक्ष वेधून घेतले. काही वेळ ट्रॅक्टर ट्रॉलीवर मांडलेल्या सिंहासनावर; तर काही वेळ पायी, अशा या मिरवणुकीत रंगत भरली ती मिरवणुकीपुढे सादर झालेल्या शिवकालीन मर्दानी खेळांनी. लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा आणि अग्निचक्राची ही थरारक प्रात्यक्षिके कोथरूड येथील धैर्य सामाजिक संस्थेच्या धैर्य मर्दानी आखाड्यातील चिमुकल्यांनी सादर केली. अण्णापूरच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनीही मिरवणुकीदरम्यान, लाठी-काठीची प्रात्यक्षिके सादर केली.