
बालगोपाळांनी लुटला पतंग उडविण्याचा आनंद
शिरूर, ता. १५ : रेणुका माता टेकडीचा निसर्गरम्य परिसर... तेथे बालगोपाळांची उडालेली झुंबड... तुझी पतंग उंच की माझी, यासाठी लागलेली चढाओढ... ''उडी उडी रे पतंग मेरी'' अन ''बाई मी पतंग उडवीत होते'', यासारखी ध्वनिक्षेपकावरून वाजणारी नवी - जुनी गाणी... सोबत खाद्यपदार्थांचीही रेलचेल... नातेसंबंधांचे धागे तुटून अनाथपण नशिबी आलेली ती बालके, कटू नये म्हणून पतंगाची दोर मात्र हिंमत अन विश्वासाने सांभाळत होते...!
निमित्त होते, मकर संक्रांतीनिमित्त आयोजिलेल्या पतंग महोत्सवाचे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज, अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांच्या मनशांती छात्रालयातील मुलांबरोबरच; परिसरातील अनाथ मुलांच्या संस्थांतील बालचमूंसाठी आयोजिलेल्या पतंग महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरापासून जवळच रेणुका माता मंदिराच्या टेकडीजवळील निसर्गरम्य परिसरात झालेल्या या महोत्सवात पतंग उडविताना ही मुले अक्षरशः हरखून गेली होती. जशी पतंग वर जाईल तसे त्यांचे चेहरे वेगळ्या आनंदाने हरखून जात होते. पतंगांच्या काटाकाटीवेळी जल्लोषही होत होता.
मनशांती संस्थेतील सत्तर मुलांनी या महोत्सवात भाग घेऊन, पतंगावर आधारित नव्या - जुन्या गाण्यांच्या जल्लोषात, आपले पतंग उडविण्यातील कौशल्य दाखवून दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मुलांसाठी पन्नास पतंग, धाग्यांसह चक्री आदी साहित्य उपलब्ध करून दिले. पतंग खेळून दमलेल्या मुलांसाठी पाण्याच्या बाटल्या आणि वडापाव, सामोसे अशी अल्पोपाहाराचीही व्यवस्था केली होती. मनसे जनहित कक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे, मनसेचे उपतालुकाध्यक्ष रवींद्र गुळादे, माजी शहर अध्यक्ष संदीप कडेकर, बंडू दुधाणे, शारदा भुजबळ, युवराज गुळादे, चेतन माने, अमोल करडे, शंकर डोकडे आदी यावेळी उपस्थित होते. मनशांती छात्रालयाचे व्यवस्थापक विनय सपकाळ यांनी उपस्थितांचे ऋण व्यक्त केले.