
दौलत शितोळे यांना खंडणीसाठी धमकी
शिरूर, ता. ९ : मासेविक्रीच्या व्यवसायात भागीदारी द्यावी, अशी मागणी करीत जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांच्याकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी एका अनोळखी व्यक्तीसह सहाजणांविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला.
शमशुद्दीन विराणी (रा. कल्याणी नगर, पुणे), पप्पू उकिरडे (रा. सणसवाडी, ता. शिरूर), सचिन घोलप (रा. धनकवडी, पुणे), केतन मल्लाव (रा. शिरूर), सनी यादव (रा. वाघोली) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध शिरूर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, विराणी व यादव यांना अटक केली आहे. शिरूर न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत (ता. ११) पोलिस कोठडी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितोळे यांचा मासे विक्रीचा व्यवसाय असून, त्या व्यवसायात निम्मी भागीदारी द्यावी व त्यापोटी तीन लाख रुपये द्यावेत, अशी मागणी करीत विराणी व इतरांनी शितोळे यांना फोनवर धमकावले. तीन लाख रुपये न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. याबाबत शहानिशा करून खंडणीचा गुन्हा दाखल केला.