महाविद्यालयीन तरुणाला मद्यपींकडून बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविद्यालयीन तरुणाला 
मद्यपींकडून बेदम मारहाण
महाविद्यालयीन तरुणाला मद्यपींकडून बेदम मारहाण

महाविद्यालयीन तरुणाला मद्यपींकडून बेदम मारहाण

sakal_logo
By

शिरूर, ता. १२ : येथील कुकडी कॉलनीतील जुन्या आयटीआयच्या मैदानालगत दारू पीत बसलेल्या चौघा मद्यपींनी महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण करीत त्याचा मोबाईल काढून घेतला. या झटापटीत तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळीही गहाळ झाली.
वीस वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी ऋषी पडवळ व शुभम पडवळ (दोघे रा. गोलेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्यासह त्यांच्या इतर दोघा साथीदारांवर (नावे समजू शकली नाहीत) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महाविद्यालयीन विद्यार्थी वह्या विकत घेऊन घराकडे जात असताना कुकडी कॉलनीतील मैदानानजीक लघुशंकेसाठी थांबला असता, तेथे चौघे दारू पीत बसले होते. त्यावेळी मद्यपींनी त्याला हटकले व ‘बारक्या पोरांचे इकडे काय काम आहे’, असा जाब विचारत त्याला धक्काबुक्की सुरू केली. यामुळे घाबरलेल्या तरुणाने वडिलांना संपर्क करण्यासाठी मोबाईल काढला असता, ऋषी पडवळ याने पाठीमागून लाथ मारून त्याला खाली पाडले व मोबाईल हिसकावून घेत त्याला दगडाने मारहाण केली. त्याचवेळी शुभम पडवळ यानेही मारहाण केली.

या मारहाण प्रकरणी शुभम पडवळ याला अटक करण्यात आली असून, इतर मद्यपी मारेकऱ्यांचा शोध चालू असल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस नाईक नाथसाहेब जगताप यांनी दिली.