
रांजणगाव सांडस येथे पतीचा गळा दाबून खून
शिरूर, ता. १५ : चारित्र्याच्या संशयावरून सतत दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीनेच गळा दाबून खून केल्याची घटना रांजणगाव सांडस (ता. शिरूर) जवळील राक्षेवाडी येथे मंगळवारी (ता. १४) घडली.
विलास ऊर्फ विकास गलचंद चव्हाण (वय ३२, रा. मोहारडा तांडा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजी नगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांचे बंधू गोविंद गलचंद चव्हाण (रा. कासारसाई, ता. मुळशी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी मृत चव्हाण यांच्या पत्नी सविता विलास चव्हाण (वय ३०) यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास चव्हाण व त्यांच्या पत्नी सविता हे कन्नड तालुक्यातील दांपत्य सध्या रांजणगाव सांडसजवळील राक्षेवाडी येथील दत्तात्रेय लक्ष्मण शिंदे यांच्या उसाच्या गुऱ्हाळाजवळील पत्र्याच्या खोलीत वास्तव्यास होते. विलास चव्हाण हे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत व दारू पिऊन सतत मारहाण करीत असत. मंगळवारी रात्रीही त्यांच्यात याच कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. त्यात विलास याने पत्नीला मारहाण केली. त्याचा राग मनात धरून सविता चव्हाण हिने पहाटेच्या सुमारास विलास यांचा गळा दाबला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या खूनप्रकरण सविता चव्हाण यांना अटक केली असून, बुधवारी त्यांना शिरूर न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव करीत आहेत.