विशेष मुलांच्या ‘खूशी’साठी आईचा काळजावर दगड! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विशेष मुलांच्या ‘खूशी’साठी आईचा काळजावर दगड!
विशेष मुलांच्या ‘खूशी’साठी आईचा काळजावर दगड!

विशेष मुलांच्या ‘खूशी’साठी आईचा काळजावर दगड!

sakal_logo
By

शिरूर, ता. १८ : भावना हरवलेली ती मुले हातवारे करीत नाचत होती, ओठांनी जमेल तसे गात होती. कुणी प्रार्थना म्हणत होते; तर कुणी घोषणा देत होते. देशभक्तिपर गीतांत भारतमातेच्या रूपातील खुशी गाणे संपताच कोसळली आणि तिची शुद्ध हरपली. तशाच अवस्थेत विशेष बालकांसाठी काम करणाऱ्या राणीताई चोरे यांनी तीला कडेवर उचलून रूग्णालय गाठले. परंतु, तोपर्यंत सारे संपले होते. आभाळाएवढे दुःख काळजात ठेवून विशेष मुलांच्या आनंदाच्या सोहळ्यावर मात्र त्यांनी पडदा पडू दिला नाही. कार्यक्रम पार पडल्यानंतरच खुशी आपल्यात राहिली नसल्याचे जाहीर केले.
चोरे या गेल्या सात वर्षांपासून शिरूर येथे विशेष मुलांसाठी ‘आकांक्षा स्पेशल चाइल्ड स्कूल’ चालवितात. त्यांच्या दोन्ही मुली आकांक्षा आणि समीक्षा ऊर्फ खुशी या देखील विशेष प्रवर्गातील असल्याने त्यांच्या पालन - पोषणाच्या निमित्ताने त्यांनी या शाळेची स्थापना केली. शाळेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात विशेष मुलांनी विविध गाण्यांवर नृत्य, देशभक्तिपर गीते सादर केली. यासाठी शाळेतील शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी गेले महिनाभर अविश्रांत परिश्रम घेतले होते. कार्यक्रमाच्या दोन दिवस आधीच खुशी हिची तब्येत काहीशी खालावली. परंतु, तशाही स्थितीत इतर मुलांच्या व विशेषतः त्यांच्या पालकांच्या आनंदावर विरजण पडू नये, याची खबरदारी घेत चोरे यांनी कार्यक्रम साजरा करण्याचा निर्धार केला.
या कार्यक्रमात सुरवातीच्या, हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे’ या प्रार्थनेत खुशी ही आईच्या अर्थात राणीताई यांच्या आधाराने उभी राहिली आणि तीने प्रार्थना म्हटली. पुढील ‘आय लव्ह माय इंडिया’ या गाण्यातील नृत्यातही तीने सहभाग घेतला. मात्र, त्यानंतर तीला अस्वस्थ वाटू लागल्याने खुर्चीवर बसविण्यात आले. यावेळी राणीताई या स्टेजवर होत्या; मात्र त्यांचे सारे लक्ष आपल्या काळजाच्या तुकड्याशी लागले होते.
पुढील कार्यक्रम चालू असतानाच खुशी खुर्चीवरून कोसळली. तेव्हा राणीताई यांनी कुणाला फारशी जाणीव होऊ न देता लगबगीने तिच्याजवळ धाव घेत तीला कडेवर उचलून घेत थेट रूग्णालय गाठले. रूग्णालयात जाण्यापूर्वीच खुशी हिची प्राणज्योत मालवली. मात्र, राणीताई यांनी स्वतःवर ओढवलेला हा अत्यंत कठीण अन् दुर्दैवी प्रसंग कटाक्षाने कुणालाही न सांगता कार्यक्रम पूर्ण करण्याच्या सूचना आयोजक व शिक्षिकांना दिल्या.
या कार्यक्रमानंतर ही दुर्दैवी बातमी जेव्हा उपस्थितांना समजली, तेव्हा वातावरण सुन्न झाले. आता आपल्यासोबत प्रार्थना म्हणणारी खुशी आपल्यात नाही म्हटल्यावर विशेष मुलेही सैरभैर झाली. अनाथ मुलांसाठी भरीव कार्य करणाऱ्या सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ द ससून हॉस्पिटल (सोफोश) संस्थेच्या प्रमुखा शर्मिला सय्यद, पुणे येथील सेंटर फॉर मेन्टल हेल्थ ॲण्ड डिसॲबिलिटी चे अध्यक्ष चेतन दिवाण, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, मराठी विभाग प्रमुख क्रांती पैठणकर, माजी नगराध्यक्षा उज्ज्वला बरमेचा, माजी उपनगराध्यक्ष सुकुमार बोरा, शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बलवंत मांडगे, पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चरापले, शिवसेवा मंडळ ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मनसुख गुगळे, शिरूरच्या (ग्रामीण) सरपंच स्वाती घावटे, माजी सरपंच विठ्ठल घावटे, नगरसेवक विनोद भालेराव व रोहिणी बनकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिरूर शाखेचे अध्यक्ष नीलेश खाबिया आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस दुःखद अंतःकरणाने खुशी हिला श्रद्धांजली वाहण्यात आली.

संघर्षातून उभारलेली संस्था
आकांक्षा (वय २१) व समीक्षा ऊर्फ खुशी (वय १९) या विशेष मुलींच्या जन्मानंतर कुठल्याच संस्थेत त्यांचा सांभाळ होऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाल्यावर राणीताई चोरे यांनीच या मुलींचा जिद्दीने सांभाळ केला. इतकेच नव्हे; तर आपल्या मुलींप्रमाणे असलेल्या इतर मुलामुलींच्या सांभाळासाठी आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशनची स्थापना केली. पराकोटीचे संघर्षमय जीवन नशिबी येऊनही अत्यंत धीरोदात्तपणे त्या ही संस्था नेटाने व जोमाने चालवीत आहेत. विशेष मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचे आविष्कार समाजासमोर यावेत, यासाठी दरवर्षी त्या शाळेचा वर्धापन दिन साजरा करून आवर्जून सामाजिक घटकांना बोलावतात. आज शाळेत २८ मुलांचा सांभाळ केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. या मुलांना शैक्षणिक
धडे आणि वागणुकीचा प्रशिक्षण दिल्यास त्यांच्यात सुधारणा होई शकते, असा विश्वास व्यक्त केला.