
शिरूर ठाण्यात कैद्याची पोलिसांच्या हातावर तुरी
शिरूर, ता. १५ : विनयभंगप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अटक केलेला कैदी शिरूर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये घेऊन जात असताना, शिरूर पोलिस ठाण्याच्या आवारात तो पोलिसांना हिसका मारून बेडीसह पळून गेला. शुक्रवारी (ता. २४) रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
धनराज मधुकर डोंगरे (वय २८, रा. मलठण फाटा, शिक्रापूर, ता. शिरूर) असे पळून गेलेल्या संशयित कैद्याचे नाव असून, पोलिस कॉन्स्टेबल उद्धव कोंडिराम भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज त्याच्या विरुद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मूळ चारदरी (ता. धारूर, जि. बीड) येथील राहणाऱ्या डोंगरे विरुद्ध दोन दिवसांपूर्वी शिक्रापूर पोलिस ठाण्यात विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, त्याला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याची वैद्यकीय तपासणी करून लॉकअपमध्ये ठेवण्यासाठी त्याला पोलिस व्हॅनमधून शिरूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. व्हॅनमधून उतरवून शिरूर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यासाठी घेऊन जात असताना त्याने पोलिस व गृहरक्षक दलाच्या जवानाला हिसका मारून बेडीसह पलायन केले. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला मात्र रात्रीची वेळ व अंधाराचा फायदा घेऊन तो पळून गेला.
या प्रकाराने पोलिस दलात खळबळ उडाली असून, गेल्या काही महिन्यांपूर्वीही शिक्रापूर पोलिसांनी अटक केलेल्या व शिरूरच्या लॉकअपमध्ये असलेल्या घरफोडीतील एका आरोपीनेही कोठडीची कौले उचकटून पलायन केले होते. या सर्व प्रकाराने शिरूर पोलिसांची कस्टडी व एकूणच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.