शिरूरमध्ये आज फेरफार अदालत

शिरूरमध्ये आज फेरफार अदालत

शिरूर, ता. १० : जमीन नोंदीसह ई-फेरफार प्रणालीमध्ये नोंदणीकृत व अनोंदणीकृत नोंदीसंदर्भात सुनावणी घेऊन त्वरित निर्णय देण्याच्या उद्देशाने महसूल विभागाच्या वतीने येत्या बुधवारी (ता. १२) एकाच दिवशी तालुक्यातील दहा मंडल विभागांच्या फेरफार अदालतीचे आयोजन केले आहे.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी शासनाने महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून, त्याअनुषंगाने ई-फेरफार प्रणालीमध्ये नोंदणीकृत व अनोंदणीकृत साध्या नोंदी एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आणि विवादग्रस्त नोंदी तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी सबळ कारणाशिवाय प्रलंबित राहणार नाहीत, या उद्देशाने तहसील व मंडलस्तरावर या फेरफार अदालतीचे आयोजन केल्याची माहिती शिरूरच्या प्रांताधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली. या अंतर्गत येत्या बुधवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून फेरफार अदालती सुरू होतील, असे त्यांनी सांगितले.
शिरूर व रांजणगाव गणपती मंडल विभागाची फेरफार अदालत शिरूरच्या तहसील कार्यालयात, मलठण व टाकळी हाजीची मलठणच्या मंडल अधिकारी कार्यालयात, तळेगाव ढमढेरे व कोरेगाव भीमाची अदालत तळेगाव ग्रामपंचायत मिटींग हॉलमध्ये, न्हावरे व वडगाव रासाईची वडगावच्या मंडल अधिकारी कार्यालयात आणि पाबळ मंडलची फेरफार अदालत पाबळच्या मंडल अधिकारी कार्यालयात होणार असल्याची माहिती तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी दिली.
या फेरफार अदालतींमध्ये सातबारा उताऱ्यावरील त्रुटी दुरुस्तीची प्रकरणे दाखल करून घेणे, संजय गांधी योजनेअंतर्गत उत्पन्न दाखले वितरित करणे व अर्ज स्वीकारणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी उत्पन्नाचे दाखले वितरित करणे, आदी कामेही केली जाणार आहेत. तसेच, हरकत नोंदींवर प्राप्त आक्षेपांचे अनुषंगाने सुनावणी घेऊन निर्णय देणे व प्रलंबित फेरफार नोंदी निर्गत करून त्याच दिवशी सातबारा व फेरफार वितरित करणे, असे कामकाज केले जाणार असल्याचे प्रांताधिकारी किसवे-देवकाते यांनी सांगितले. आपापल्या परिसरातील या फेरफार अदालतीस उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सूर्यवंशी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com