गप्पा मारत बसलेल्या चौघांना मोटारीची धडक

गप्पा मारत बसलेल्या चौघांना मोटारीची धडक

शिरूर, ता. २९ : करडे-रांजणगाव गणपती अष्टविनायक मार्गावर बाभूळसर खुर्द (ता. शिरूर) येथे शनिवारी (ता. २९) सकाळी साडेआठच्या सुमारास अतिवेगामुळे अनियंत्रित झालेली एक मोटार कट्ट्याला धडकली. या अपघातात कट्ट्याजवळील बाकड्यावर गप्पा मारत बसलेले चौघे जखमी झाले. जखमींतील एकाचे उपचारादरम्यान सायंकाळी निधन झाले.
रामदास किसन शिंदे (वय ५५) असे या अपघातातील मृताचे नाव असून, संतोष नंदू वाळके, अकबर अलीभाई शेख व महादू विठ्ठल वांझुळ (सर्व रा. बाभूळसर खुर्द) हे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. जखमी महादू वांझुळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी आशिष योगेंद्र बांदल (रा. करडे, ता. शिरूर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाभूळसर येथे पीरसाहेब मंदिर असून, त्याच्या बाहेरील बाजूस रस्त्याच्या कडेला बाकडे टाकलेले आहे. त्यावर सकाळी रामदास शिंदे यांच्यासह चौघेजण गप्पा मारीत बसले असताना करडेहून रांजणगावकडे भरधाव जाणाऱ्या मोटारीचे (क्र. एमएच १२ पीसी ५३३३) नियंत्रण सुटले व मोटार कट्ट्यावर व बाकड्यावर येऊन आदळली. त्यात चौघे जखमी झाले. जखमींना कारेगाव व रांजणगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मात्र, रामदास शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर चालक बांदल हा मोटार जागेवरच सोडून पळून गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com