जंगली श्‍वापदाच्या हल्ल्यात तिघे जखमी

जंगली श्‍वापदाच्या हल्ल्यात तिघे जखमी

शिरूर, ता. २ : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील तामखरवाडी परिसरात सोमवारी (ता. १) सायंकाळी सहाच्या सुमारास अज्ञात जंगली श्वापदाने केलेल्या हल्ल्यात एका महिलेसह तिघे जखमी झाले. पिसाळलेल्या कोल्ह्याने हा हल्ला केला असल्याचा आरोप स्थानिक नागरीकांनी केला असताना वनखात्याने मात्र याला थेट दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे अज्ञात प्राण्याविषयी तामखरवाडी - टेमकरवाडी परिसरात दहशत पसरली आहे.
या हल्ल्यात दशरथ मारुती मुंजाळ (वय ७०), पूजा विनोद कळकुंबे (वय २५) व सुरेश मारुती चौरे (वय ४०) हे जखमी झाले असून, प्राथमिक उपचारानंतर त्यांना शिरूरच्या ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमी तिघेही शेतकरी कुटुंबातील असून, आपापल्या शेतात काम करीत असताना त्यांच्यावर जंगली श्वापदाने हल्ला केला. या तिघांच्याही म्हणण्यानुसार हल्ला करणारा प्राणी कोल्हा असून, तो पिसाळलेला असावा.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा कळकुंबे या आपल्या शेतातील कांदे काढण्याचे काम करीत असताना कोल्ह्यासारख्या दिसणाऱ्या तपकिरी काळसर रंगाच्या प्राण्याने त्यांच्यावर समोरून हल्ला करीत डोळ्याच्या वर कडकडून चावा घेतला. तिथे असलेल्या महिलांनी काठी आपटत आरडाओरडा करताच श्वापद पळून गेले. त्यानंतर काही वेळातच तेथून जवळच शेतात गवत कापत असताना त्यांच्यावरही जंगली श्वापदाचा हल्ला झाला. त्यांच्या हाताला जोरदार चावा घेतल्याने खोल जखम झाली . या दोन घटनांनंतर जवळपास तासाभराने सुरेश चोरे हे शेतातील काम उरकून घराकडे जात असताना त्यांच्या पायाला या प्राण्याने चावा घेतला. त्यांनी पाय झटकत आरडाओरडा केल्यानंतर श्वापदाने धूम ठोकली.
तिघांनाही टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तेथून प्राथमिक उपचारानंतर शिरूरच्या ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. तिघांचीही प्रकृती स्थिर असून, गरज पडल्यास पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रूग्णालयात नेले जाईल, असे वनखात्याकडून सांगण्यात आले.
या घटनेनंतर शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनरक्षक लहू केसकर व वनपाल गणेश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. एक ते दीड किलोमीटरच्या परिसरात तीन ठिकाणी एकाच जंगली श्वापदाचे हल्ले झाले असले, तरी हल्ला करणारा प्राणी हा कोल्हाच असावा, असे लगेचच ठामपणे सांगता येणार नाही. या परिसरात कुठेही कोल्ह्याच्या पायाचे ठसे आढळले नाहीत, असे म्हसेकर यांनी सांगितले.

कोल्हा शक्यतो कळपात राहतो. एकट्याने हल्ला करण्याची शक्यता कमी आहे. तरीही पिसाळल्यास भटकून तो हल्ला करू शकतो. अशा प्रकारचे जंगली श्वापद किंवा कोल्हासदृष प्राणी आढळून आल्यास तातडीने वनखात्याशी संपर्क साधावा. त्याचा ठावठिकाणा शोधून जेरबंद केले जाईल. तो जखमी असेल तर जाळे टाकूनही पकडता येईल, अन्यथा पिंजरा लावला जाईल.
- मनोहर म्हसेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com