गणेगावात चोरट्यांची महिलेला मारहाण

गणेगावात चोरट्यांची महिलेला मारहाण
Published on

शिरूर, ता. १६ : गणेगाव खालसा (ता. शिरूर) येथील एका घराचा दरवाजा उचकटून घरात शिरलेल्या चोरट्यांनी कोयता, कुऱ्हाडीचा धाक दाखवीत सव्वादोन लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. यावेळी प्रतिकार करणाऱ्या एका महिलेला मारहाण केल्याने ती जखमी झाली. शुक्रवारी (ता. १६) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.
चोरट्यांच्या हल्ल्यात पुष्पा संजय पवार (वय २८, रा. पद्मावती वस्ती, गणेगाव खालसा) या जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. त्यांचे पती संजय मोतीराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी चार अनोळखी चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेगावच्या पद्मावती वस्ती येथे राहणारे पवार दांपत्य गुरुवारी रात्री जेवणखाण करून झोपले असताना पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्याकडील साहित्यांनी दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. यावेळी पवार दांपत्य जागे झाले असता चोरट्यांनी त्यांच्याकडील कोयता व कुऱ्हाडीचा धाक दाखवून घरातील कपाटाच्या चाव्या हस्तगत केल्या. कपाटाची तोडफोड करून गंठण, नेकलेस, कानातील झुबे, अंगठ्या, मंगळसूत्र आदी सोन्याचे सुमारे साडेचार तोळे सोन्याचे दागिने, लहान मुलांचे चांदीचे दागिने व तीस हजार रोख रक्कम हस्तगत केल्यानंतर चोरट्यांनी पुष्पा यांच्याकडे मोर्चा वळविला. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व कर्णफुले हिसकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील दागिने हिसकावले. रोख रकमेसह सुमारे दोन लाख २३ हजारांचा ऐवज हस्तगत करून चोरट्यांनी पोबारा केला.
या घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, उपनिरीक्षक विनोद शिंदे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळावरून चोरट्यांनी हाताळलेल्या वस्तूंवरील बोटांचे ठसे घेतले असून, परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात असल्याचे या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com