महायुतीच्या आमदारांची वाटचाल खडतर

महायुतीच्या आमदारांची वाटचाल खडतर

शिरूर, ता. ५ : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार आणि भाजपचा एक, असे पाच आमदार एका बाजूला असल्याने महायुतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या विजयाचे कागदावरील गणित जुळत असतानाही ‘कागदावर प्रभाव पण प्रत्यक्षात बेबनाव’ या स्थितीमुळे महायुतीला शिरूरची जागा गमवावी लागली. महायुतीच्या या पराभवामुळे या मतदारसंघातील दिग्गज आमदारांची भावी वाटचाल मात्र खडतर झाली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा जनमानसातील करिष्मा अधोरेखित करणाऱ्या या निवडणुकीतील डॉ. अमोल कोल्हे यांचा देदीप्यमान विजय मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह कॉंग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील दुसऱ्या फळीतील परंतु निष्ठावान कार्यकर्त्यांना बूस्टर देणारा ठरला आहे. विजयाची सारी समीकरणे जुळूनही केवळ शरद पवार यांचा झंझावात होत्याचे नव्हते करू शकतो, या धास्तीने महायुतीकडून लढण्यास इच्छुक असलेल्या आणि विधानसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांच्या पोटात आतापासून गोळा आला आहे. परिणामतः विधानसभेसह आगामी सर्वच छोट्या- मोठ्या निवडणुकांवर या निकालाचे दाट सावट पसरू शकते, असे चित्र आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), दिलीप मोहिते पाटील (खेड), अतुल बेनके (जुन्नर) व चेतन तुपे (हडपसर) हे तसेच भोसरीतील भाजपचे महेश लांडगे असे पाच आमदारांचे बलाढ्य बळ महायुतीकडे; तर विरोधात शिरूरचे अशोक पवार हे शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव आमदार, असे बलाबल असतानाही डॉ. कोल्हे यांनी भोसरीतील आढळरावांचे साडेनऊ हजाराचे मताधिक्क्य वगळता इतर मतदार संघात जोरदार मुसंडी मारली. त्यास वळसे पाटलांचा आंबेगाव मतदारसंघही अपवाद राहिला नाही. वास्तविक आंबेगाव हे प्रतिस्पर्धी उमेदवार आढळराव पाटील यांचे होमपीच असताना तेथूनही डॉ. कोल्हे यांनी मिळविलेली आघाडी भल्याभल्यांना चकित करणारी आणि राजकीय जाणकारांची गणिते चुकवणारी ठरली. ‘पवारसाहेबांविषयी सहानुभूतीची लाट होती,’ असे पालुपद आता हे आमदार पुढील निवडणुकांपर्यंत लावणार असले; तरी मग त्यांनी काय काम केले? हा प्रश्न अनुत्तरीतच राहणारा आहे. हाच प्रश्न भविष्याच्या राजकारणात संबंधित आमदारांना त्यांच्या अस्तित्वाच्या भयावह वळणावर घेऊन जाणारा ठरण्याची धास्ती आतापासूनच व्यक्त केली जात आहे.
आमदार लांडगे यांनी ‘आढळराव यांना भोसरीतून एक लाखाचे मताधिक्क्य मिळवून देऊ,’ अशी राणा भीमदेवी थाटातील गर्जना केली होती. परंतु, हे मताधिक्क्य केवळ नऊ हजारावर आल्याने त्यांची कशीबशी लाज राखली गेली. या निवडणुकीत आपण घड्याळ चिन्हाचा प्रचार केला तर आपल्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत कमळ चिन्हावर मते मागताना अडचण होईल, या सोयीच्या धास्तीने आमदारांसह भावी नगरसेवकांनी घेतलेले हात आखडते धोरण महायुतीसाठी स्पीडब्रेकर ठरले.
राष्ट्रवादीतील फुटीमध्ये अजितदादांच्या बंडात सामील झालेले सहकारमंत्री वळसे पाटील हे पवारसाहेबांबद्दल ‘ब्र’देखील काढण्यास धजावत नसल्याचे चित्र असून, लोकसभा मतदानाच्या दिवशी तर पवारसाहेबांना सहानुभूतीचा फायदा होईल, या त्यांच्या जाहीर वक्तव्याचाही विपरीत परिणाम आढळरावांना भोगावा लागला. आंबेगावातील दोन्ही बडे नेते एक झाल्याने विरोध संपल्याचे चित्र निर्माण केले गेले. मात्र, ते किती तकलादू होते, हे डॉ. कोल्हे यांनी मिळविलेल्या आघाडीतून स्पष्ट झाले. दुसऱ्या फळीतील, छोट्या पण जिगरबाज कार्यकर्त्यांनी दिलेरीने केलेल्या कामातून घरच्या मैदानावर देखील आढळरावांची फरपट झाली. मात्र, त्यांची ही पीछेहाट अनेक दिग्गजांच्या भावी वाटचालीवर गंडांतर आणणारी ठरेल, अशी धास्ती आतापासून व्यक्त केली जात आहे.
या निकालाचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार नसल्याची खेडचे मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया म्हणजे न बोलता अंगावर ओढून घेण्याचाच प्रकार आहे. मात्र, तेथील डॉ. कोल्हे यांच्या घसघशीत आघाडीचे उत्तर सद्यःस्थितीत तरी त्यांच्याकडे नसल्याचे दिसत आहे. जुन्नरमध्येही महायुतीअंतर्गत बेबनावाने डॉ. कोल्हे यांना भलीमोठी आघाडी मिळाली. या निवडणुकीत आपल्या हक्काच्या मतदारांना न दुखवण्याच्या हडपसरच्या नेत्यांचा व लोकप्रतिनिधींचा दुरदृष्टीपणा मतलबी राजकारणाचाच नमुना ठरला. मात्र, राजकारणातील याच मतलबीपणाचे उट्टे विधानसभेसह भावी निवडणुकांतही निघू शकतात, अशी शक्यता दबक्या आवाजात वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीतील फुटीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी निष्ठा राखणारे शिरूरचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतली. अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सोडून गेलेले असताना शिस्तबद्धपद्धतीने प्रचाराचे मायक्रो प्लॅनिंग केले. त्यांच्या कामाचा रिझल्ट तीस हजारांच्या दणदणीत मताधिक्क्यात दिसून आला. दादागिरीच्या भाषेने काहीसे तणावात आणि दहशतीखाली आलेल्या ॲड. पवार यांना या निकालातून संजीवनी मिळाली असून, त्यांच्यात आता पुढील निवडणुका लढविण्याठी दहा हत्तीचे बळ संचारले आहे.

लोकसभा निवडणूक निकालाचे गडद सावट आगामी विधानसभा निवडणुकांबरोबरच जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर निवडणुकांवर पडणार असल्याचे स्पष्ट चित्र असून, छोटछोट्या सुभ्यांच्या सुभेदारांनी या निवडणूक निकालाच्या केलेल्या उत्स्फूर्त जल्लोषाची किनार आगामी निवडणुकांच्या तोरणांना आतापासूनच दिसू लागली आहे. या नव्या चेहऱ्यांचा वाढत चाललेला अतिउत्साह मात्र प्रस्थापितांची डोकेदुखी वाढविणारा ठरला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com