रांजणगाव सांडस शाळेच्या 
शिक्षकांची मुजोरी कायम

रांजणगाव सांडस शाळेच्या शिक्षकांची मुजोरी कायम

Published on

शिरूर, ता. ८ : शाळा तपासणीसाठी आलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला मारहाण करून हाकलून देणाऱ्या आणि याच कारणास्तव निलंबित झालेल्या रांजणगाव सांडस (ता. शिरूर) केंद्रातील जिल्हा परिषदेच्या दत्तनगर शाळेतील महेश आनंदराव काळे व कैलास फक्कड पाचर्णे या शिक्षकांनी शाळेवरील ताबा कायम ठेवला असून, निलंबनाच्या पत्राला केराची टोपली दाखवून वरिष्ठांच्या आदेशाला फाट्यावर मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
शाळा तपासणीसाठी आलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ बजाबा पवार यांना काळे व पाचर्णे यांनी मुख्याध्यापक कक्षात कोंडून मारहाण केल्याचा प्रकार २८ जून रोजी दत्तनगर शाळेत घडला होता. याबाबत पवार यांनी सादर केलेल्या अहवालाची दखल घेत व या अहवालासोबत त्यांनी सादर केलेले मोबाईलवरील रेकॉर्डिंग व चित्रफितीच्या आधारे गटविकास अधिकारी डोके यांनी गेल्या मंगळवारी (ता. २) या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली होती.
या कारवाईनंतर सुरवातीचे दोन दिवस रजेवर गेलेले हे शिक्षक पुन्हा शाळेवर दाखल झाले असून, त्यांनी शाळेचा ताबा घेतल्याचे चित्र आहे. या शिक्षकांना निलंबित केले असल्याचे पत्र घेऊन केंद्रप्रमुख डी. सी. वेताळ हे गेले असता त्यांनी निलंबनाचा आदेश स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांच्या मोबाईलवर व्हॉटसअपद्वारे निलंबनाच्या आदेशाचे पत्र सोडले असून, त्यांच्या पत्त्यावरही टपालाने प्रत पाठविली असल्याचे गटविकास अधिकारी डोके यांनी सांगितले. याबाबत जिल्हा परिषदेला अहवाल सादर केला असून, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर या शिक्षकांना मुख्यालयाला बोलाविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निलंबनाची कारवाई झाल्यानंतरही महेश काळे व कैलास पाचर्णे हे शिक्षक दत्तनगर शाळेवर हजर असून, सोमवारी (ता. ८) त्यांनी रजेवर जात असल्याचे पत्र शाळा व्यवस्थापन समितीकडे दिल्याचे समजते. या शिक्षकांनी जाताना तीन वर्गखोल्यांसह रजिस्टर कुलूपबंद केल्याने इतर शिक्षकांना हजेरी लावणे मुश्कील झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला मारहाण करूनही आणि त्यावरून निलंबित होऊनही पुन्हा शाळेवर हजर होणाऱ्या या शिक्षकांबाबत ग्रामस्थांमध्ये उलट- सुलट चर्चा असून, राजकीय व शिक्षक संघटनांच्या माध्यमातून निलंबन मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.