मतदान प्रक्रियेयाठी प्रशासन सज्ज
शिरूर, ता. १९ : शिरूर विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेची सर्वतोपरी तयारी प्रशासनाने केली असून, मतदान ते मतमोजणीसाठी सुमारे तीन हजारावर कर्मचारी तैनात केले आहेत. लोकसभेप्रमाणेच शिरूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणीही यावेळी पहिल्यांदाच रांजणगाव एमआयडीसीतील राज्य वखार महामंडळाच्या गोदामामध्ये होणार आहे. त्यासाठी तेथे सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
शिरूर शहरासह तालुक्यातील ५७ गावे व वाघोलीसह हवेली तालुक्यातील ३७ गावे मिळून बनलेल्या या मतदार संघात एकूण ४५७ मतदान केंद्रे असून, त्यातील २१३ शिरूर तालुक्यात तर २४४ हवेली तालुक्यातील गावांत आहेत. यापैकी २६१ मतदान केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’ करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मतदानाच्या दिवशी अपंग मतदारांसाठी १९७ ‘व्हील चेअर’ची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांच्या सोयीसाठी ‘वोटर हेल्प डेस्क’ची निर्मिती करण्यात आली असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी कंट्रोल रूम तयार केला आहे.
मतदान केंद्राध्यक्ष ५०६, मतदान अधिकारी एक हजार १२७, शिपाई ४५७ व राखीव २०६ असे मिळून एकूण दोन हजार ८०६ कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केले असून या मतदार संघासाठी एकूण एक हजार ६९० ईव्हीएम मशिन प्राप्त झाले आहेत. त्यात ५४८ बॅलेट युनिट, ५४८ कंट्रोल युनिट व ५९४ व्हीव्हीपॅट चा समावेश असल्याची माहिती राजापूरकर यांनी दिली. मतदार संघामध्ये एकूण एक हजार ५७५ मतदारांना टपाली मतपत्रिका देण्यात आल्या आहेत.
लहान मुलांसाठी पाळणाघराची निर्मिती
मतदारसंघामध्ये ८५ च्या वर वय असलेले एकूण ३१६२ मतदार असून, त्यांना मागणीप्रमाणे गृह मतदानासाठी वाहन व्यवस्था, स्वयंसेवक व इतर सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मतदान कर्मचारी व साहित्य मतदान केंद्रावर पोचविण्यासाठी व परत आणण्यासाठी एकूण ७२ एसटी बसेस, ९ मिनी बसेस व ९ जीप असे मिळून ९० वाहने तैनात मतदान केंद्राच्या ठिकाणी आरोग्य विषयक सुविधा देण्यासाठी आरोग्य पथकाची निर्मिती केली आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी अभ्यागत कक्ष, माता व लहान मुलांसाठी पाळणाघराची निर्मिती केली असून, तेथे आशा वर्कर व अंगणवाडी सेविका नियुक्त केल्या आहेत.
सर्व नागरिक, मतदार व उमेदवारांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शकपणे व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. सुज्ञपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा. मतदानाला येताना आपले मतदार ओळखपत्र किंवा आधारकार्ड व इतर ओळखपत्र सोबत ठेवावे. मतदान कक्षात मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे.
- संगीता राजापूरकर, निवडणूक निर्णय अधिकारी, शिरूर विधानसभा मतदार संघ
04409
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

