उसाच्या फडात आढळले बिबट्याचे चार बछडे
शिरूर, ता. १८ : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील देवाची वाडीजवळ ऊसतोड सुरू असताना उसाच्या फडात बिबट्याचे चार बछडे आढळून आल्याने भितीचे वातावरण पसरले. एकाच ठिकाणी चार बछडे आढळून आल्याने मादी बिबटही त्याच परिसरात असण्याची शक्यता असून, खबरदारी घेण्याचे आवाहन वनखात्याने केले. दरम्यान, वनखाते व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बछड्यांच्या आईशी पुनर्मिलनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
देवाची वाडी परिसरात रामदास लवांडे यांच्या शेतात ऊसतोडीचे काम सुरू होते. शनिवारी दुपारी उसाच्या फडात अचानक बिबट्याचे चार बछडे आढळल्याने ऊसतोड कामगारांची घाबरगुंडी उडाली. ऊसतोड बंद करून वनविभागाला याबाबत कळविल्यानंतर वनपरिमंडल अधिकारी गणेश पवार, वनरक्षक भानुदास शिंदे, नियतक्षेत्र अधिकारी वंदना चव्हाण, प्रमोद पाटील यांच्यासह निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व वनविभाग रेस्क्यू टिमचे सदस्य शेरखान शेख, जयेश टेमकर, अमोल कुसाळकर यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व ऊसतोड कामगार व शेतकऱ्यांना उसाच्या फडातून बाहेर पडण्याच्या सूचना केल्या.
या पथकाने हळूवार उसाच्या फडामध्ये पाहणी करीत चारही बछड्यांना ताब्यात घेतले. सध्या या बिबट्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, आईशी पुनर्मिलनासाठी रात्री पुन्हा त्याच फडात ठेवले जाणार असल्याची माहिती वंदना चव्हाण यांनी दिली. नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

