ओळख न पटल्याने मृतदेह ससूनला हलविले

ओळख न पटल्याने मृतदेह ससूनला हलविले

Published on

शिरूर, ता. २७ : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मृत महिला व दोन मुलांची अद्याप ओळख न पटल्याने शवविच्छेदनानंतर हे मृतदेह तज्ज्ञांच्या वैद्यकीय सल्ल्यासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. यातून काही बाबी उघड होतील, अशी तपास यंत्रणांना आशा आहे. सर्व शक्यतांचा विचार करून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून, सहा विशेष पथके कार्यरत झाली आहेत.
रांजणगाव गणपती जवळील खंडाळे माथा परिसरात काल दुपारी एका बंद कंपनीच्या मागील बाजूस झुडपात २५ ते तीस वयोगटातील महिला आणि दीड व चार वर्षांची मुले मृतावस्थेत आढळल्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला. खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला होता. तथापि, पावसामुळे हे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, काल शिरूर येथील शवविच्छेदन गृहात तीनही मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर एक्स्पर्ट ओपिनियन साठी ते ससून ला हलविण्यात आले. तेथे तपासणी करून मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत.
शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तीनही पोलिस ठाण्यांची पथके या गंभीर प्रकरणाच्या तपासकामी कार्यरत झाली असून, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकही समांतर तपास करीत आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, शिरूरचे पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी व शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण सहा पथके विविध मार्गांनी तपास करीत आहेत. यात मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल करण्याबरोबरच पुणे जिल्ह्यासह राज्यात कुठे महिलेसह दोन लहान मुले बेपत्ता झाली आहेत का, याबाबतची माहिती घेतली जात आहे. बेपत्ता व्यक्तींच्या शोधाबरोबरच घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फूटेज, परिसरातील खोली मालकांकडून भाडेकरूंची माहिती घेतली जात आहे. या प्रकरणात प्रथमच मानवी तस्करी विरोधी सेलची मदत घेतली जात असल्याची माहिती तपास अधिकारी वाघमोडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com