शिरूरमध्ये वटवृक्षाची जोपासना करण्याचा संकल्प

शिरूरमध्ये वटवृक्षाची जोपासना करण्याचा संकल्प
Published on

शिरूर, ता. १० : येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात चौफेर विस्तारलेल्या २५ वर्षे जुन्या वटवृक्षाचे काटेकोर संवर्धन व संगोपन करण्याचा संकल्प वटपौर्णिमेनिमित्त शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांसह वटवृक्षाच्या पूजेसाठी आलेल्या महिला भगिनींनी केला.
या स्कूलच्या प्रांगणात भव्य व डेरेदार वटवृक्ष असून, हा डेरेदार वटवृक्ष येणाऱ्या-जाणारांचे सहज लक्ष वेधून घेतो. शहरातून जाणाऱ्या पुणे-अहिल्यानगर रस्त्याकडेची वडाची झाडे काही वर्षांपूर्वी रस्तारुंदीकरणात तोडली गेल्याने शहर व परिसरात आता हाच एकमेव वटवृक्ष सुस्थितीत राहिला आहे. या वटवृक्षाच्या पूजनासाठी आज दिवसभर महिला भगिनींनी मोठी गर्दी केली होती. वटवृक्षाला आंबा, गहू वाहून विडा व पानसुपारीने पूजन करून सातपदर दोऱ्यांनी प्रदक्षिणा घालून जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, अशी आराधना करतानाच महिला भगिनींनी या वटवृक्षाच्या जोपासनेचा संकल्प केला.
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ सन १९९५ ला झाला. संस्थेचे बोधचिन्ह असलेले वडाचे झाड इमारतीच्या प्रांगणात असावे, या हेतूने तत्कालीन नगराध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य (स्व.) शहिदखान पठाण यांनी तत्कालीन शिक्षक हिंदूराव शिंदे, चिंतामणी देशमुख, मुरलीधर शेंडे, चंद्रकांत चोबे, जगन्नाथ बोराटे, धनराज बडेकर यांच्याशी विचारविनिमय करून सन २००० ला वटपौर्णिमेच्या दिवशी शाळा इमारतीच्या प्रांगणात वडाचे छोटेसे रोपटे लावले. या रोपट्याच्या संगोपनाची जबाबदारी एका शिक्षकावर व एका सेवकावर सोपविली. २५ वर्षांत या रोपट्याच्या जागी भव्य, डेरेदार वटवृक्ष उभा राहिला असून, त्याच्या फांद्या व पारंब्यांचा मोठा विस्तार झाला आहे. संस्थेचे बोधचिन्ह असलेला हा वटवृक्ष जोपासना करताना सर्वतोपरी काळजी घेतली जात असल्याचे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य जाकिरखान पठाण यांनी सांगितले. किमान शंभर विद्यार्थी सावलीत बसू शकतात एवढा या डेरेदार वटवृक्षाचा विस्तार झाला असून, मजबूत खोड असूनही केवळ सुरक्षितता म्हणून काही वर्षांपूर्वी झाडाभोवती सिमेंट कॉंक्रिटचा पार बांधल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शहर व परिसरातील वटवृक्षांच्या भोवती दिवसभर पूजेसाठी महिलांची गर्दी दिसत होती. पारंपारिक वेशात, सजून-धजून आलेल्या महिला वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून मनोभावे पूजा करताना दिसत होत्या. ठिकठिकाणी वटवृक्षासोबत सेल्फी घेण्यात नवविवाहिता दंग झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com