शिरूरमध्ये महिलांना चोरट्यांची धास्ती
शिरूर, ता. ११ : जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शिरूर शहर व परिसरात सोनसाखळी चोरीच्या सलग चार घटना घडल्यानंतर आणि त्याआधी मे महिन्यात शिरूर बसस्थानकावर महिलेचे तब्बल दहा तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या शिरूर पोलिसांनी दोन सोनसाखळी चोरांना आणि दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक केली. त्याचवेळी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनीही एका सराईत सोनसाखळी चोराच्या मुसक्या आवळल्याने सोनसाखळी हिसकावण्याच्या प्रकारांना काहीसा आळा बसला आहे. मात्र, रस्त्याने एकट्या- दुकट्या फिरणाऱ्या महिलांच्या मनातील भीती आणि सोनसाखळी चोरांची धास्ती मात्र वारंवारच्या घटनांमुळे कायम आहे.
शिरूरमधील चोरीच्या घटना
गृहरक्षक दलात कार्यरत असलेल्या चंदाबाई बबन चव्हाण या १ जून रोजी रात्री प्रीतम प्रकाश नगर परिसरातील आपल्या घराबाहेर आल्या असताना कुंपणाजवळ दुचाकीसह दोन तरुण उभे दिसल्याने त्यांनी त्यांना हटकले. त्यावेळी काहीतरी विचारायच्या बहाण्याने ते चव्हाण यांच्याजवळ आले. त्यातील एकाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पळ काढला. वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे एक, अशा पाच घटना घडल्या. दोन घटनांत चोरट्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने संबंधित महिलांनी पोलिसांकडे जाणे टाळले. त्याआधीच्या दोन महिन्यांत शहरातील जोशीवाडी, तर्डोबाचीवाडीकडे जाणारा रस्ता, बागवान नगर व संभाजीनगर या शहर परिसरात आणि फलके मळा (ता. शिरूर) व रांजणगाव गणपती येथेही सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या.
३५० सीसीटीव्ही तपासले
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या सहाय्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी १२ जूनला कारवाई करीत मारुती ऊर्फ गोविंद रामनाथ आंधळे (रा. लिंबोडी, पो. देवी निमगाव, ता. आष्टी, जि. बीड) याला शिरूरजवळील सतरा कमानीच्या पुलावर पकडले. तेव्हा त्याने शरद बापू पवार (रा. लोणी सय्यदमीर, ता. आष्टी, जि. बीड) या साथीदाराच्या मदतीने शिरूर शहर व परिसर, रांजणगाव गणपती व शिक्रापूर भागात सोनसाखळी चोरीचे आठ गुन्हे केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे दहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि गुन्हे करताना वापरलेली दुचाकी जप्त केली. त्याचा साथीदार पवार पोलिसांना गुंगारा देत असला तरी या मोठ्या कारवाईनंतर या परिसरातील सोनसाखळी चोरीच्या प्रकारांना आळा बसला आहे. या कारवाईसाठी पोलिसांनी सुमारे ३५० सीसीटीव्ही तपासले होते. शिरूर बसस्थानकावर महिलेच्या पर्समधून सुमारे दहा तोळ्यांचे दागिने चोरणाऱ्या मनिषा कसबे व शोभा दामोदर (रा. अहिल्यानगर) यांना अटक करून चोरीला गेलेले दागिने हस्तगत करण्याची कामगिरी शिरूर पोलिस दलाने केली होती. नुकतेच हे दागिने संबंधित महिलेला परत करण्यात आले. विनाक्रमांकाची महागडी दुचाकी, चोरट्यांचे चेहरे रुमालाने किंवा मास्कने झाकलेले, कानटोपी अशा अवतारात येत. त्यामुळे त्यांची सहजासहजी ओळखही पटत नव्हती. तरीही दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले
पत्ता विचारण्याचा बहाणा
शिरूरमध्ये दुचाकीवरून आलेले दोघे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांजवळ जात क्षणात त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसका मारून तोडून काढत पळ काढत होते. यात महिला भेदरून जात. कधी अचानक ओढवलेल्या संकटाने अस्थिर होऊन हादरून जात. काही चोरट्यांचा पाठलाग करताना धडपडल्याचे प्रकारही घडले होते.
हिसका मारून सोनसाखळी खेचून (चेन स्नॅचिंग) चोरून नेण्याच्या घटना सातत्याने घडत असताना पोलिस दल सतर्क झाले असून, एक टोळी पकडली आहे. त्यांच्याविरूद्ध कठोर व परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यापुढे जात संघटित गुन्हेगारीअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर केला आहे. सतत असे प्रकार घडत असलेले हॉटस्पॉट शोधून तेथे सीसीटीव्ही लावले आहेत. त्या परिसरात पोलिस गस्तीसह वरचेवर नाकेबंदीही केली जात आहे.
- प्रशांत ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.