अण्णापूरमध्ये देशसेवा अन् राष्ट्रभक्तीच्या महापूर
नितीन बारवकर : सकाळ वृत्तसेवा
शिरूर, ता. १४ : हातभट्टी दारूचे कोठार आणि मांसाहारी अन्नाचा महापूर, यामुळे एकेकाळी काहीशा अवहेलनात्मक नजरेने पाहिल्या जाणाऱ्या अण्णापूर (ता. शिरूर) गावची ओळख आता बदलत आहे. देशसेवेसाठी सैन्यात आणि कायदा- सुव्यवस्था राखण्याकामी पोलिस दलात भरती होणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असून, देशसेवा आणि राष्ट्रभक्तीच्या माध्यमातून गावाची जुनी ओळख पुसून जवानांचे गाव, अशी नवी ओळख निर्माण होऊ पाहात आहे. साडेतीन हजार लोकसंख्येच्या या गावातील १२ जण सद्यःस्थितीत सैन्यदलात विविध पदांवर कार्यरत असून, ३७ जण पोलिस खात्यात सेवा बजावत आहेत. गावात वीसहून अधिक माजी सैनिक असून, ते सामाजिक कार्य, देशसेवा यासाठी तरुण पिढीला सतत प्रेरणा देत असतात.
शेती, दूधधंदा यामुळे काहीशा नावारूपाला आलेल्या अण्णापूरमध्ये एकेकाळी हातभट्टी दारूधंद्यांचाही मोठा बोलबाला होता. दारूड्यांचा उपद्रव, पोलिसी कारवाईमुळे गावात सतत अस्थिरता, अशांतता असायची. गावावरील हा बदनामीचा कलंक पुसून टाकण्याचा चंग तरूणांबरोबरच, माजी सैनिक, शिक्षक, ग्रामस्थांनी बांधला. त्यातून गेल्या काही वर्षांत शिकल्या सवरलेल्या तरुणांचा भारतीय सैन्यदलाबरोबरच पोलिस दलात जाण्याकडे ओढा वाढला. यात आता मुलीदेखील मागे राहिलेल्या नसून, गतवर्षी गावातील पाच मुली एकाचवेळी पोलिसात भरती झाल्या आहेत. सपना कुरंदळे, सुप्रिया कुरंदळे, माधुरी रासकर, प्रियांका पवार, स्नेहलता गव्हाणे, करिष्मा कुरंदळे, दिक्षा कुरंदळे, पुनम पवार व नलिनी पवार या सध्या पुणे, मुंबईसह इतर ठिकाणी पोलिस सेवा बजावत आहेत. निखिल पवार व विजय झंजाड हे सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून पुण्यात कार्यरत असून, त्यांच्यासह २६ तरुण पोलिस दलात भरती होऊन कायदा- सुव्यवस्था राखण्याकामी विविध ठिकाणी योगदान देत आहेत.
ग्रामीण भागात सैन्यातील तरुणांना किंवा आजी- माजी सैनिकांना मेजर, तर पोलिस दलातील व्यक्तीला साहेब हे शब्द रूढ असल्याने अण्णापूरमध्ये आता मेजर आणि साहेबांची वाढती संख्या भूषणावह ठरत आहे. त्यातून एकेकाळी बदनाम असलेल्या या गावाला सर्वत्र सन्मानाची वागणूक मिळत असून, सैनिकी सेवेमुळे सर्वसामान्य ग्रामस्थांनाही आता सर्वत्र आदर आणि मान मिळत आहे.
सैन्यदलातील जवान
योगेश झंजाड, नीलेश झंजाड, गेनभाऊ कुरंदळे, संदीप झंजाड, भरत कुऱ्हे, संतोष कुरंदळे, विशाल कुरंदळे, कैलास वाळके, पांडुरंग घावटे, पोपट कुरंदळे, सागर पाचर्णे, नदीम पठाण, प्रतिक बनकर व संदीप पवार हे तरुण सध्या सैन्यदलात विविध पदांवर कार्यरत असून, देशाच्या कानाकोपऱ्यात देशांच्या सीमांचे रक्षण करताना काहीजण तांत्रिक सज्जतेकामी योगदान देत आहेत.
माजी सैनिकांचे योगदान
दशरथ कापरे, दत्तात्रेय शिंदे, तान्हाजी चौगुले, कारभारी शिंदे, धनाजी पवार, शिवाजी पाचर्णे, गंगाराम कुरंदळे, बबन पवार, आबाजी झंजाड, मोहन गव्हाणे, काळुराम पवार, अंबादास काळे, विकास शिंदे, नीलेश शिंगोटे, हनुमंत भुजबळ हे माजी सैनिक शेतीसह, छोटे- मोठे व्यवसाय व विविध कामांमध्ये कार्यरत असून, गावातील सामाजिक कार्यात सहभाग घेत ते तरुण पिढीला सतत व्यसनांपासून दूर राहण्याचे आणि गावची सैनिकी परंपरा टिकवून ठेवण्याबाबत सतत मार्गदर्शन करीत असतात.
नामदेव शिंदे, रामचंद्र शिंदे, निवृत्ती शेळके, दिगंबर शेळके, रामदास झंजाड, अंबादास पवार, राजेंद्र कुऱ्हे हे माजी सैनिक काळाच्या पडद्याआड गेले असून, ते माजी सैनिकच आमच्या गावच्या सैनिकी परंपरेचे भक्कम आधार व मजबूत पाया होते. त्यांच्या योगदानावरच गावात सैनिक सेवेचे आकर्षण निर्माण झाले असून, त्यावर आताची तरुणाई सैन्यसेवेचा कळस चढविताना दिसत आहे.
- बबनराव पवार, अध्यक्ष,
शिरूर तालुका आजी- माजी सैनिक संघटना
गावातील सैनिकांच्या सन्मानार्थ आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. त्या अंतर्गत सर्व आजी- माजी आणि दिवंगत सैनिकांच्या नावाचा उल्लेख असलेला फलक ग्रामपंचायत कार्यालयात अग्रभागी
लावला आहे. शिवाय स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात माजी सैनिकांबरोबरच उपस्थित असलेल्या जवानांचाही सन्मान केला जातो.
- डॉ. संतोष शिंदे, युवा सामाजिक कार्यकर्ते
गावातील आजी- माजी सैनिकांचा ग्रामस्थांसह आम्हा सर्वांनाच सार्थ अभिमान असून, त्यांच्या योगदानातून, देशसेवेच्या कार्यातूनच गावाची ओळख बदलत आहे. गाव बदलण्यात या सैनिक बांधवांचा, पोलिस बांधवांचा मोठा वाटा असून, त्यांच्या सहज वावरातून गावात शांतीचे आणि एकदिलाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
- संतोष झंजाड, सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका
गोलेगावची ओळख सैनिकांचे गाव
सैनिकांचे गाव हीच शिरूर तालुक्यातील गोलेगावची ओळख असून, आत्तापर्यंत गावातील १२५हून अधिक जणांनी सैनिकी सेवा बजावली आहे. पहिल्या महायुद्धात तीन, तर दुसऱ्या महायुद्धात तीनजण हुतात्मा झाले असून, कारगिल युद्धात बाळासाहेब गायकवाड यांना वीरमरण आले आहे. दुसऱ्या महायुद्धात इंग्रजी फौजेत उल्लेखनीय काम केलेल्या या गावातील काही जवानांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतही अमूल्य कामगिरी केली आहे. सुभेदार सचिन पडवळ हे भटींडा (पंजाब) येथे कार्यरत आहेत व नुकत्याच झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या तांत्रिक बाबीत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.