नावातून साकारली अक्षर गणेश प्रतिमा
शिरूर, ता. ३ : गणपतीचा मुकुट, सोंड, कान, उदर आणि मांडी यांवर नाव आणि आडनाव कोरून अनोखा ‘अक्षर गणेश प्रतिमा’ रेखाटण्याचा उपक्रम कल्पक, सृजनशील आणि हरहुन्नरी शिक्षक महेश इंगळे तीन वर्षांपासून राबवीत आहेत. या उपक्रमांतर्गत त्यांनी आत्तापर्यंत अक्षर गणेशाच्या दोनशेहून अधिक प्रतिमा स्वहस्ते साकारल्या असून, अनेक संस्था, शाळांसह मान्यवर व्यक्ती, साहित्यिक, पत्रकार, अधिकारी, खेळाडू व मान्यवर व्यक्तींना भेट दिल्या आहेत.
गोलेगाव (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले महेश इंगळे हे प्राथमिक शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करतानाच वेळ मिळेल तेव्हा अक्षर गणेश रेखाटण्याचे काम अखंडपणे करीत आहेत. व्यक्तीचे नाव व आडनाव यासह संस्था, संघटना, अधिकारी, फर्म यांच्या नावाच्याही प्रतिमा त्यांनी साकारल्या आहेत. काही मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, आमदार, खासदार, पत्रकारांसह गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांनाही त्यांनी त्यांच्या नावाच्या अक्षर गणेश प्रतिमा बनवून दिल्या आहेत. त्यांच्या पत्नी सोनिया व मुलगी चैतन्या यांना देखील या कलाकुसरीच्या कामाची आवड निर्माण झाल्याने त्या देखील अक्षर गणेश रेखाटतात.
त्यांनी आत्तापर्यंत दोनशेहून अधिक प्रतिमा साकारल्या असल्याचे इंगळे यांनी सांगितले. ही प्रतिमा साकारताना संबंधित व्यक्तीचे नाव, आडनाव, त्यांचे पद, हुद्दा याचा विचार करून ते गणेशाच्या प्रतिमेत चपखलपणे व कल्पकतेने बसवावे लागते. मूळात गणरायाची सोंड, कान, उदर, मुकुट या बाबी कलात्मक असल्याने कुठलेही नाव किंवा आडनाव त्यामध्ये सहजगत्या बसविता येते. या प्रतिमा साकारताना तेलखडूंबरोबरच स्टेन्सिल्स, रंगीत पेन्सिल्स, सॉफ्ट ऑइल पेस्टल, स्केच पेन, जलरंग वापरत असून, मूळ चित्राच्या रेखीवपणासाठी व बारीक कामासाठी थायलंडहून मागविलेले रंग वापरतो, असे त्यांनी सांगितले.
इंगळे यांच्या अक्षर गणेश प्रतिमांना पुणे व मुंबई येथे भरलेल्या चित्र प्रदर्शनात स्थान मिळाले असून, अनेक ठिकाणी त्यांच्या या प्रतिमा झळकल्या आहेत. झपूर्झा या प्रसिद्ध चित्रसंग्रहालयातही त्यांच्या अक्षर गणेशाची प्रतिमा लावण्यात आली आहे.
पारनेर (ता. अहिल्यानगर) येथील शिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांच्याकडून अक्षर गणेश प्रतिमा साकारण्याची प्रेरणा मिळाली. पण ते ज्या पद्धतीने अक्षर गणेश साकारीत त्याची नक्कल न करता, काही सुधारणा करीत, कल्पकता वापरून स्वतःची शैली विकसित केली आहे. श्री गणेशाच्या २१ नावांचा सहभाग असलेली आणि मराठी राजभाषेवर आधारित अक्षर गणेश प्रतिमा लवकरच साकारणार आहे. साधे चित्र आणि फ्रेम स्वरूपातील अक्षर गणेश चित्रांना या पुढील काळात डिजिटल टच देणार आहे.
महेश इंगळे, अक्षर गणेश प्रतिमाकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.