शिरूरमधील मिरवणुकीत सर्वधर्मीय नागरिकांचा सहभाग
शिरूर, ता. ८ : इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त शहरात सोमवारी (ता. ८) मिरवणूक काढण्यात आली. मुस्लिमांसह सर्वधर्मीय नागरिक व सर्वपक्षीय पदाधिकारी या मिरवणूक सोहळ्यात सहभागी झाले होते.
लाटे आळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील मलंगशा बाबा दर्ग्यापासून मिरवणुकीला सुरवात झाली. यावेळी मिरवणुकीच्या पुढे असलेल्या निशाणला पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, विश्वास भोसले, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, पोपट ओस्तवाल, नामदेवराव घावटे, नीलेश विभूते, रवींद्र सानप, सुनील जाधव, प्रा. सतीश धुमाळ, सागर नरवडे, राहुल पिसाळ, डी. टी. बर्गे, संजय देशमुख, विनोद भालेराव, शरद कालेवार, रेश्मा शेख, प्रमोद महाराज जोशी, डॉ. वैशाली साखरे, हाफीज बागवान, सुशांत कुटे, आबिद शेख, मंगेश खांडरे, डॉ. परवेझ बागवान, केशव लोखंडे, स्वप्नील रेड्डी, राजूभाई शेख आदी उपस्थित होते.
मुस्लिम जमात चे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष नसीम खान यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सामाजिक उपक्रमाबद्दल इत्तेहाद ग्रुप व मदीना मस्जिद ग्रुपचा मुस्लिम जमातच्या वतीने सन्मान करण्यात आला. मौलाना सोहेल रजा यांनी धार्मिक प्रार्थना म्हटली. मौलाना कैसर फैजी यांनी प्रास्ताविकात ईदचे महत्त्व विशद करताना मोहम्मद पैगंबरांच्या कार्याचा आढावा घेतला.
मिरवणुकीवेळी अनेक मंडळांनी नागरिक व मुलांना विविध खाद्यपदार्थांचे वाटप केले. मनसेच्या वतीने पाच कंदील चौकात लाप्शीचा महाप्रसाद वाटण्यात आला. महिबूब सय्यद, अविनाश घोगरे, ॲड. आदित्य मैड, रविराज लेंडे, रवींद्र बापू सानप, अनिल बांडे आदींनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.
अल मदद बैतुल माल कमिटीचे अध्यक्ष फिरोज बागवान यांनी सूत्रसंचालन केले. शहर काझी, नसीम काझी, मौलाना ताहिर असी, मौलाना अश्पाक कारी, मौलाना आरिफ यांनीही ईदचे महत्त्व नमूद करताना सर्व समाजाला शुभसंदेश दिले. सिकंदर मणियार यांनी आभार मानले.