रंगीबेरंगी आकाशकंदील, पणत्यांनी सजल्या बाजारपेठा
शिरूर, ता. १२ : वैविध्यपूर्ण आकाराच्या रंगीबेरंगी आकाशकंदीलांचे हजारो प्रकार...फुलमाळा, फुलदाण्या... मातीच्या, मेणाच्या पणत्यांबरोबरच विविध धातूंचे पणत्यांचे उरली... लक्ष्मीच्या पावलांचे ठसे आणि उंबऱ्यावर चिकटावयाच्या वैविध्यपूर्ण डिझाईनच्या पट्ट्या... दरवाजावर लावायची तोरणे आणि दोहोबाजूंनी लटकविण्यासाठी हत्ती, घंटी आणि कवड्यांनी गुंफलेले झुंबर... लक्ष्मीसह, श्रीराम, शिवाजीमहाराजांच्या प्रतिमा... चिनी माती, धातू आणि काचेच्या गाय - वासराच्या प्रतिमा... दिवाळीच्या सणासाठी घरादाराला, दुकानांना सजविण्यासाठी असंख्य सजावटीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असून, या सजावटींच्या साहित्यांनी शिरूरची बाजारपेठ सजली आहे.
शिरूर शहराची बाजारपेठ ही शिरूरसह पारनेर व श्रीगोंदे तालुक्यातील अनेक गावांची मध्यवर्ती बाजारपेठ असून, दिवाळी आठवडाभरावर येऊन ठेपल्याने ग्राहकांची पावले बाजारपेठेकडे वळू लागली आहेत. ग्राहकांची बदलती अभिरूची आणि तयार वस्तू घेण्याकडे वाढलेला कल पाहता विक्रेत्यांनी अनेकविध वस्तूंसह, सजावटीचे वैविध्यपूर्ण साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. प्लॅस्टिकच्या फुलमाळांसह, आर्टिफिशियल फुलांची तोरणे, हार विक्रीसाठी आले आहेत. घराच्या किंवा दुकानाच्या प्रवेशद्वाराच्या आकारमानानूसार विविध साईजचे हार व तोरणे विक्रेत्यांकडून तयार करून दिले जातात.
हजारो प्रकारच्या, विविधरंगी, वैविध्यपूर्ण, रंगीबेरंगी आकाशकंदीलांनी बाजारपेठेला दिवाळीची चाहूल लागली आहे. प्रीतेश गादिया यांच्या दुकानात कागदी, कापडी, लाकडी, ज्यूट पासून बनविलेल्या इको फ्रेंडली आकाशकंदीलांचे किमान सहाशे प्रकार उपलब्ध आहेत. दुकानाची प्रवेशद्वारे सजविण्यासाठी छोट्या आकाशकंदीलांच्या माळा, छोट्या दिव्यांच्या माळाही विविध रंगांत उपलब्ध आहेत. दहा रूपयांपासून तीन हजार रूपयांपर्यंत आकाशकंदीलांच्या किंमती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सुजीत मैड या विक्रेत्याने खास दिवाळीसाठी सजावटीच्या पणत्या, पणत्यांचे ताट (उरली) झुंबरमाळा, लाम्हणदिवा असे अनेक साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या असंख्य वस्तू ज्यात केशरगंधापासून, मलमली वस्त्र आणि कुबेर, लक्ष्मीच्या मूर्तीपासून जर्दोषीच्या सजावटीच्या वस्तू आहेत. रेड किंवा गोल्डन पॅटर्नच्या विविध उंबरापट्टी हे यंदाच्या दिवाळीतील सजावटीच्या वस्तूंचे आकर्षण ठरले आहे. तयार रांगोळीचे स्टीकर, स्वस्तिक, शंख व विविध शुभवस्तू देखील नव्याने बाजारात आल्या आहेत.
आकाशकंदीलांचे वैविध्यपूर्ण प्रकार उपलब्ध
दिवाळीतील सजावटीचा मुख मान आकाशकंदीलाला असतो. त्यानुसार कुशल कारागिरांकडून आकाशकंदीलांचे वैविध्यपूर्ण प्रकार उपलब्ध केले जातात. अनेक कल्पक कारागिर बदलत्या ट्रेंडनुसार आकाशकंदील बनवितात. येथील राजविजय जाधव या कलाकाराने असंख्य आकाशकंदील स्वहस्ते बनवून विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत.
यंदाची दृष्टिक्षेपातील आकाश कंदील
१. दिवाळीवर राम मंदिर, मराठा आरक्षण आणि राजकीय घडामोडींसह हिंदुत्वाचा प्रभाव
२. राममंदिराच्या आकारासह, आयोध्येत प्रतिष्ठापित केलेल्या श्रीरामाच्या मूर्ती आकाशकंदीलावर
३. कंदिलांवर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसह एक मराठा लाख मराठाची घोषणा
४. चोहोबाजूंनी लिहिलेले केशरी रंगाचे लाकडी आकाशकंदीलही बाजारपेठेत दिसतात.
05740
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.