मद्यपानाच्या भांडणातून मित्राचा खून

मद्यपानाच्या भांडणातून मित्राचा खून

Published on

शिरूर, ता. १३ : दारू पिताना झालेल्या भांडणातून दोघांनी आपल्याच मित्राचा गळा दाबून व मारहाण करून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह येथील प्रीतम प्रकाश नगर जवळील एका पाण्याच्या खड्ड्यात टाकून पळून गेलेल्या एका अल्पवयीनासह दोघांना शिरूर पोलिसांनी ताब्यात घेतले.
अशोक तात्या खंडागळे (वय ३१, रा. बोऱ्हाडे मळा, शिरूर) असे मृताचे नाव आहे. तर आकाश ज्ञानेश्वर लोहार (रा. शिरूर) याच्यासह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. २७ सप्टेंबरला खुनाचा हा प्रकार उघडकीस आला होता. येथील प्रीतम प्रकाश नगरमधील पांजरपोळ संस्थेच्या जागेतील एका पाण्याच्या खड्ड्यात अशोक खंडागळे याचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी सुरवातीला अकस्मित मृत्यूची नोंद केली होती; परंतु शवविच्छेदन अहवालात खंडागळे याचा बुडून मृत्यू झाला नसल्याचे व त्याच्या शरीरावर मारहाणीचे आणि गळा आवळल्याचे व्रण आढळून आल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला दिशा दिली. पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व दिलीप पवार, पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर, सचिन भोई, विजय शिंदे, नीतेश थोरात, निखिल रावडे, नीरज पिसाळ, अंबादास थोरे, अजय पाटील यांनी दोन पथके तयार करून घटनास्थळाची पाहणी करताना प्रत्यक्षदर्शींकडून माहिती मिळवली. त्याआधारे परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे हल्लेखोरांची माहिती मिळवली. त्यातून हा खुनाचा गुन्हा उघडकीस आला. २५ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता हल्लेखोरांनी मृत खंडागळे याला शिरूरमधील श्रद्धा बार येथे दारू पिण्यासाठी बोलावून घेतले होते. तेथे दारू पिताना त्यांच्यात वाद झाले. त्यातून लोहार व त्याच्या अल्पवयीन साथीदाराने खंडागळे याला दुचाकीवरून प्रीतम प्रकाश नगर येथे नेले व तेथे बेदम मारहाण करीत गळा आवळला. या मारहाणीत खंडागळेचा मृत्यू झाल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह तेथीलच एका पाण्याच्या खड्ड्यात टाकून पळ काढला. यातील लोहार याला सोलापूर जिल्ह्यातील कौठाळी (ता. पंढरपूर) येथून तर अल्पवयीन मुलाला शिरूरमधून ताब्यात घेतले.

Marathi News Esakal
www.esakal.com