शिरूरला दोनही विधानसभा मतदारसंघात सभापतिपदाची संधी

शिरूरला दोनही विधानसभा मतदारसंघात सभापतिपदाची संधी

Published on

शिरूर, ता. १३ : शिरूर पंचायत समितीचे सभापतिपद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले असून, शिरूर व टाकळी हाजी या गणांवर हे आरक्षण पडल्याने तेथून सभापती निवडला जाणार आहे. यातील शिरूर गण हा विधानसभेच्या शिरूर मतदारसंघात; तर टाकळी हाजी गण आंबेगाव मतदार संघात येत असल्याने दोन्ही तालुक्यातील दिग्गज नेतेमंडळींकडून या गणांतील वर्चस्वासाठी आतापासूनच व्यूहरचना सुरू झाली आहे.
शिरूर येथे मुख्य प्रशासकीय इमारतीतील दालनात आज प्रांताधिकारी विठ्ठल जोशी व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या उपस्थितीत १४ गणांचे आरक्षण सोडत पद्धतीने कायम करण्यात आले. स्वयम् प्रकाश फरगडे या दुसरीतील विद्यार्थ्याने सोडतीच्या चिठ्ठ्या काढल्या. त्यानुसार शिक्रापूर, कारेगाव, रांजणगाव गणपती, रांजणगाव सांडस व न्हावरे हे महत्त्वाचे गण खुले झाल्याने या गणातील लढती रंगतदार होणार आहेत. शिरूर व टाकळी हाजी या गणातून सभापती निवडला जाणार असल्याने तेथेही चुरस दिसणार आहे.
मागील पंचायत समितीवर एकत्रित राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकहाती वर्चस्व होते. राष्ट्रवादीची एकसंध ताकद असतानाही त्यावेळी भाजपसह शिवसेना व स्थानिक विरोधकांनी आपापल्या गट- गणांत वर्चस्व राखण्यात यश मिळविले होते. सद्य राजकीय स्थितीत महाविकास आघाडी- महायुती असा दृष्टीक्षेप टाकला तर सदस्यसंख्येनुसार महायुतीचे वर्चस्व दिसून येते. गेली दहा वर्षे सभापतिपद महिलेसाठीच आरक्षित असल्याने व बहुतांश सदस्या देखील महिलाच असल्याने पंचायत समितीवर महिलाराज होते. आताही सभापतीपदासह एकूण संख्येच्या निम्म्या (१४ पैकी ७) महिलाच सदस्य निवडून द्यावयाच्या असल्याने इथून पुढे पाच वर्षेही महिलाराजच दिसणार आहे. त्यामुळे पुरुषसत्ताक राजकीय आखाड्यात काहीशी नाराजीची भावना पसरली आहे. तरीही पत्नी, आई किंवा बहिणींना पुढे करून तालुक्याच्या गाड्याची वेसण आपल्याच हातात कशी राहील, याचेही नियोजन काही महत्वांकाक्षी नेत्यांकडून केले जात असल्याचे चित्र आहे.

गणनिहाय आरक्षण : वडगाव रासाई : अनुसूचित जाती, शिरूर ग्रामीण : इतर मागास प्रवर्ग महिला, टाकळी हाजी : इतर मागास प्रवर्ग महिला, पाबळ : इतर मागास प्रवर्ग, केंदूर : सर्वसाधारण महिला, कवठे येमाई : सर्वसाधारण महिला, तळेगाव ढमढेरे : सर्वसाधारण महिला, सणसवाडी : सर्वसाधारण महिला, मांडवगण फराटा : सर्वसाधारण महिला, शिक्रापूर : सर्वसाधारण, कारेगाव : सर्वसाधारण, रांजणगाव गणपती : सर्वसाधारण, रांजणगाव सांडस : सर्वसाधारण, न्हावरे : सर्वसाधारण.

मागील पक्षीय बलाबल
१४पैकी आठ सदस्य राष्ट्रवादीचे होते. मात्र, सद्यःस्थितीत ते समप्रमाणात दोन्ही राष्ट्रवादीत विभागले गेले आहेत. गेल्या कार्यकारिणीत भाजपचे तीन, तर लोकशाही क्रांती आघाडी दोन आणि शिवसेनेचा एक सदस्य असे बलाबल होते.

प्रमुख समस्या
तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक खेडेगावांत नागरीकरण वाढत असून, वाढत्या नागरीकरणातून नागरी सुविधांवर ताण पडत आहे. सांडपाणी या समस्यांच्या तुलनेत सार्वजनिक स्वच्छता आणि कचऱ्याची वाढती समस्या आ वासून उभी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com