धारिवालांसमोर आता कोण?

धारिवालांसमोर आता कोण?

Published on

धारिवालांसमोर आता कोण?

शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीचे नगारे अद्याप घुमू लागले नसले तरी इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उद्योगपती (स्व.) रसिकलाल धारिवाल व माजी आमदार (स्व.) बाबूराव पाचर्णे या नगर परिषद निवडणुकीतील पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांच्या अनुपस्थितीत होत असलेल्या या निवडणुकीत अनेकांनी उडी घेतली असली, तरी कोण कोणाच्या बाजूने, हे अद्याप गुलदस्तातच असल्याने स्पर्धात्मक लढतीचे चित्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.

- नितीन बारवकर, शिरूर

शिरूर नगर परिषदेवर सन २००७ पासून प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वाखालील शिरूर शहर विकास आघाडीचे वर्चस्व आहे. सलग २५ वर्षे नगराध्यक्षपद भूषविलेल्या रसिकलाल धारिवाल यांचा त्यापूर्वीपासून शहरावर एकछत्री अंमल होता. परंतु, गेल्या तीन निवडणुकांत धारिवालांच्या पॅनेलला पाचर्णे यांनी दिलेर कार्यकर्त्यांच्या जोरावर जेरीस आणले होते. नगर परिषदेवरील वर्चस्वात पाचर्णे अपयशी ठरले असले, तरी त्यांनी धारिवालांच्या अभेद्य शक्तीसमोर विरोधी आवाजही बुलंद केला होता. दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या निधनानंतर परस्परविरोधी कटूता शमली आहे. त्यामुळे धारिवालांसमोर आता कोण? हा प्रश्न प्रकर्षाने समोर आला आहे.
धारिवाल यांच्या शिरूर शहर विकास आघाडीशी माजी आमदार अशोक पवार यांची सुरवातीपासूनच जवळीक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह कॉंग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संमिलित आहेत. विधानसभा निवडणुकीत माउली कटके यांच्या रूपाने महायुतीने यश संपादन केले. शहरातील अनेक तरूण कार्यकर्त्यांचे या यशात महत्वाचे योगदान आहे. त्यामुळे आमदार कटके यांना त्यांच्या महत्वाकांक्षा जपाव्या लागणार आहेत. त्यातून नगर परिषद निवडणुकीतील समीकरणे बदलू शकतात. मात्र, महाविकास आघाडीबरोबरच महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी धारिवाल यांचे सलोख्याचे संबंध स्थानिकांच्या महत्वाकांक्षांसमोर किती मोलाच्या ठरतात, हे येणारा काळच ठरवणार आहे. धारिवालांनी उघडपणे अशोक पवार यांचे समर्थन केले. त्यामुळे आमदार कटके गेले वर्षभर गुश्शातच होते. मात्र, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार कटके यांच्यासह प्रकाश धारिवाल विकासकामांच्या शुभारंभाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आल्याने राजकीय पटलावर मात्र त्रांगडे निर्माण झाले आहे.
शिरूर शहर विकास आघाडीने सर्वपक्षीयांची मते जाणून घेत धारिवालांना रिंगणात उतरण्याची गळ घातली आहे. मात्र, त्यांनी भूमिका अद्याप उघड केली नाही. गेल्या वेळी विरोधी बाजूने चांगली वातावरणनिर्मीती केलेल्या लोकशाही क्रांती आघाडीअंतर्गत बरीच फाटाफूट झाली. त्यातील काही नेत्यांनी धारिवाल यांच्यासमोर शरणागती पत्करल्याचे चित्र आहे. तुल्यबळ विरोधक असलेल्या पाचर्णे यांची अनुपस्थिती, भाजपंतर्गत उत्साहाची कमतरता आणि लोकशाही क्रांती आघाडीचे घटलेले बळ, याचा शिरूर शहर विकास आघाडी कसा लाभ उठवते, याची उत्सुकता आहे.

मागील वेळेचे पक्षीय बलाबल
शिरूर शहर विकास आघाडी : १७, भाजप : २, लोकशाही क्रांती आघाडी : १, अपक्ष : १.

शहरातील समस्या
- सार्वजनिक स्वच्छता, अंतर्गत रस्ते, पदपथावरील दिवे या मुलभूत समस्यांचे पूर्णपणे निराकरण झालेले नाही.
- नागरिकांना शुद्ध व पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही.
- अतिक्रमण, दाट लोकवस्ती, कचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचा आणि वाहन पार्किंगचा अभाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com