गृहिणी पदाला ना मानधन, ना वेळेचे बंधन...
राष्ट्रीय गृहिणी दिन विशेष
शिरूर, ता. २ : माहेर आणि सासरलाही शेतकरी कुटूंबाची पार्श्वभूमी... सात बहिणींच्या सोबत माहेरी गृहिणीवर्गावर असलेली सगळीच कामे करावी लागायची, तीच स्थिती सासरी देखील... दोन्हीकडील एकत्रित कुटुंबात गृहिणीपदच वाट्याला तरीही त्यात सुख शोधण्याचा प्रयत्न... पतीसह कुटूंबातून वेगळे झाल्यावर शेतात मोलमजूरीच्या कामासाठी भटकंती... तीन मुले पदरात असताना पतीवियोगाचे दुःख गिळून पुन्हा स्वयंपाकाची कामे आणि घरात गृहिणीपदाची जबाबदारी... आणि हे गृहिणीपद अत्यंत जबाबदारीने सांभाळताना मुलांना शिकवून स्वतःच्या पायावर उभे करीत निवृत्तीचा काळ सुखाचा घालवतानाही गृहिणींसाठी स्वयंपाकासह विविध खाद्यपदार्थांच्या रेसिपींचे मार्गदर्शन... वयाची साठी ओलांडली तरी कुटुंबासाठी त्या ‘आदर्श गृहिणी’ बनून खंबीरपणे उभ्या आहेत.
कमल जाधव या आदर्श गृहिणीचा संघर्ष चकित करणारा आहे. त्यांची मुलगी स्वाती जाधव-लोहकरे या यवतमाळ येथे न्यायाधीश म्हणून कार्यरत असून, जावई पोलिस अधिकारी आहेत. मुलगा संदीप संगणक अभियंता म्हणून हिंजवडीतील नामवंत कंपनीत वरिष्ठ पदावर तर त्याची पत्नी वाघोलीतील इंजिनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. मोठी मुलगी पूनम विवाहानंतर दिघी येथे स्थायिक असून, तिचे पती देखील मोठ्या कंपनीत अधिकारपदावर आहेत. नातवंडांचे पालनपोषण, स्वयंपाकाची पूर्णतः जबाबदारी आणि घरदार सांभाळताना कमलताईंनी आपली स्वयंपाकाची आवड तसूभरही कमी होऊ दिली नाही. उलट ‘कमल्स किचन’ या नावाने समाज माध्यमावर सातत्याने विविध पदार्थांच्या रेसिपी त्या शिकवत असून, नोकरी, कामाच्या निमित्ताने स्वयंपाकासाठी कमी वेळ मिळणाऱ्या महिलांना विविध पदार्थांचे शॉर्टकटस त्या या माध्यमातून सांगतात.
खुटबाव (ता. दौंड) हे कमलताईंचे माहेर तर काटेवाडी (ता. बारामती) हे सासर. माहेरी सात बहिणींत स्वयंपाकासह घरकामाची मोठी जबाबदारी पेलताना गृहिणीपदाचे बाळकडू मिळाले. रांधा, वाढा, उष्टी काढा ही जबाबदारी पेलताना विवाह झाला. सासरी देखील गृहिणीची जबाबदारी सांभाळताना शेतीतील कामेही त्या तेवढ्याच तडफेने करीत. पुढे पतीसह विभक्त झाल्यानंतर तीन मुलांसह भिगवण, यवत व परिसरात शेतात मिळेल ते काम करून प्रसंगी मोलमजुरी करून प्रपंच पुढे नेला. अशातच आभाळ कोसळले. तीन मुले पदरात असताना १९९७ ला पतीचे आजाराने निधन झाले. या धक्क्यातून सावरत त्यांनी आणखी जिद्दीने, मेहनतीने मुलांना शिकविले.
माहेरी स्वयंपाकाची जबाबदारी पेलताना वैविध्यपूर्ण शाकाहारी, मांसाहारी पदार्थ बनवावे लागायचे. सासरीही स्वयंपाकघरात रमले. स्वतंत्र कुटुंबात तर स्वयंपाक ही जबाबदारीच होती. गृहिणीपदात जे चढउतार पहावे लागले, त्यातूनच प्रत्येक पदार्थाची बनविण्याची पद्धत तावून-सुलाखून निघाली. त्यामुळे हाताला एक लज्जत आली असावी.
कमल जाधव, गृहिणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

