शिरूर शहराचा चेहरा- मोहरा बदलून टाकू
शिरूर, ता. २८ : ‘‘पुणे- नाशिक व पुणे- अहिल्यानगर रेल्वेमार्ग, पुणे- संभाजीनगर एक्सप्रेस वे, पुणे ते शिरूर उन्नतमार्गासह चारही दिशांना विस्तारणारे औद्योगिकरण आणि शिक्षणासाठीचे विकसित ठिकाण यामुळे शिरूर शहर नजीकच्या भविष्यात एक महत्त्वाचे शहर म्हणून राज्याच्या केंद्रस्थानी येणार आहे. त्यादृष्टीने शिरूर शहराच्या चौफेर व सर्वांगिण विकासासाठीचा डीपीआर तयार करू व या निवडणुकीनंतर शंभर दिवसांचा विकासाचा कालबद्ध कार्यक्रम राबवून शहराचा चेहरा- मोहरा बदलून टाकू,’’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली.
शिरूर नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी येथील पाच कंदील चौकात झालेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे व राहुल जगताप, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, संचालक सुधीर फराटे, विठ्ठलराव ढेरंगे, दिलीप वाल्हेकर, शशिकांत दसगुडे, महेश ढमढेरे, श्रीनिवास घाडगे, शरद कालेवार, आरती भुजबळ आदी यावेळी उपस्थित होते. मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे यांच्यासह विनोद भालेराव, विठ्ठल पवार, नीलेश लटांबळे व अभिजित पाचर्णे या माजी नगरसेवकांनी यावेळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांनी सूत्रसंचालन केले. घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे यांनी आभार मानले.
अजित पवार म्हणाले, ‘‘बारामतीच्या विकासाचे मॉडेल राज्यभर मांडले जाते. ते मॉडेल उभे करणारा मी आहे. त्यामुळे शिरूर शहराला देखील विकासाचे मॉडेल म्हणून उभे करण्याचा माझा निर्धार आहे. माजी आमदार बाबूराव पाचर्णे, माजी नगराध्यक्ष रसिकभाऊ धारिवाल व शहिदखान पठाण यांनी त्यांच्या कारकिर्दीत या शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले. तीच परंपरा प्रकाश धारिवाल यांनी पुढे चालवली. मात्र व्यावसायिक व्यापामुळे ते या निवडणुकीत उतरू शकले नाही. यावरून विरोधक थापा मारीत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आमदार माउली कटके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सर्वसमावेशक पॅनेल उभे केले. सुशिक्षित, विकासाची जाण असलेले कार्यक्षम उमेदवार दिले आहेत. या पॅनेलच्या पाठिशी शिरूरकर जनतेने आपली ताकद उभी करावी. धारिवाल यांच्या संकल्पनेतील विकासाचा विचार समोर ठेवूनच आम्ही या शहराचा शिस्तबद्ध विकास करू. व्यापार, व्यवसाय, शेती, कौशल्याधारित उद्योगांच्या माध्यमातून शहरात पायाभूत सुविधेचे जाळे निर्माण करू.’’
‘‘शहरासाठी ७१ कोटीची पाणीपुरवठा योजना, प्राथमिक शाळा इमारतीसाठी तीन कोटी आदींसह गेल्या अडीच वर्षांत शहरासाठी सुमारे ऐंशी कोटींहून अधिकचा निधी आणला आहे,’’ असे आढळराव पाटील यांनी सांगितले. विरोधकांनी दहा वर्षे आमदार म्हणून केलेल्या कामाची आणि आम्ही एक वर्ष आमदार म्हणून केलेल्या कामाची सुज्ञ नागरीकांनी तुलना करावी, असे आवाहन आमदार कटके यांनी केले.
रसिकभाऊ धारिवाल व प्रकाश धारिवाल यांनी शहराच्या विकासाला वेगळी उंची व रूप दिले. माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनीही शहर विकासासाठी योगदान दिले. आता अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार माउलीआबांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला नवी दिशा द्यायची आहे. बाबूराव पाचर्णे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवीत असून, सामान्य शिरूरकर जनता त्यांची स्वप्नपूर्ती करेल, असा मला विश्वास आहे.
- ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार, शिरूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

