‘खोट्या प्लेसमेंट ब्युरो रातोरात गायब

‘खोट्या प्लेसमेंट ब्युरो रातोरात गायब

Published on

शिरूर, ता. ४ : ‘रांजणगाव एमआयडीसी परिसरात दुबई येथील मोठी कंपनी आली असून, या कंपनीच्या अंतर्गत बंदोबस्तकामी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमायचे आहेत,’ असा बनाव करून अनेक तरुण-तरुणींना रांजणगाव गणपती येथे बोलावून त्यांच्याकडून ड्रेस, बूट किटच्या नावाखाली पाच ते दहा हजार रुपये उकळल्याचा आणि या तरुणांसह तरुणींना उघड्यावरील एका मंगल कार्यालयात डांबून धाकदपटशा केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर आणि त्याबाबत गंभीर दखल घेत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या गोरख धंद्यात विनाकष्ट हात ओले करून घेणार्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी धाडसाने कारवाईचा बडगा उगारताच अनेक ‘खोट्या प्लेसमेंट ब्युरो’ रातोरात गायब झाले आहेत.
चकाचक प्लेसमेंट ब्युरो थाटायचे, ‘आकर्षक पगाराच्या नोकऱ्यांची सुवर्णसंधी’ अशी जाहिरातबाजी करायची, नोकऱ्यांचे विविध स्रोत उपलब्ध असल्याचे फलक झळकावीत पॉश कार्यालये थाटायची आणि स्ट्रॉंग शरीरयष्टीचे तरुण तेथे तैनात करून दहशत निर्माण करायची... शिरूर तालुक्यातील कारेगाव, रांजणगाव गणपती, शिक्रापूर, कोरेगाव भीमा परिसरात अशा नोकरीविषयक मार्गदर्शन केंद्रांचे पेव फुटले असून, त्यांच्या सत्यासत्यतेबाबत, अधिकृततेबाबत मात्र कुठल्याही शासकीय यंत्रणेचा अंकुश नसल्याचेच दिसून येत आहे. पोलिस यंत्रणाही हे आमच्या अधिकारात नसल्याचे सांगत अशा उद्योगांकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसते.
रांजणगाव एमआयडीसीत सुमारे पाचशेहून अधिक देशी-विदेशी उद्योग असल्याने व तेथे अनेक कामांच्या संधी उपलब्ध असल्याचे हेरून या उद्योगांना कामगार पुरविण्याच्या नावाखाली अनेकांनी कमी कष्टांत पैसे छापायचे उद्योग गेल्या काही वर्षांपासून सुरू केले आहेत. त्यासाठी छोटे गाळे, टपरीवजा दुकानांतून नोकरीविषयक मार्गदर्शन केंद्रेही स्थापन केली आहेत. सोशल मिडियावरील व्हॉटस्ॲप, इन्स्टाग्राम, फेसबुकवरून नोकरीचे, मोठ्या पगाराचे, राहण्याची व्यवस्था व खाण्यापिण्याची सोय असे आमिष दाखविण्याऱ्या जाहिराती टाकून अनेक बेरोजगार व नोकरीच्या शोधातील तरुण-तरुणींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून राजरोस सुरू आहेत. प्लेसमेंट ब्युरोचे शुल्क, कामाच्या ठिकाणचा गणवेष किंवा बुटासाठी म्हणून या गरजू तरुण-तरुणींकडून पाच ते दहा हजार रुपये प्रमाणे लाखो रुपये या नसत्या उद्योगातून सहज उकळले गेले आहेत. याबाबत रांजणगाव एमआयडीसीत कामाच्या शोधात आलेल्या अनेक तरुण-तरुणींनी तक्रारी केल्या आहेत. नोकरीचे आमिष दाखवून पाच ते दहा हजार रुपये घ्यायचे आणि नोकरी न देता फसवणूक करायची, याबाबत विचारणा केली तर दमदाटी आणि प्रसंगी मारहाण करायची, असे प्रकार यातील अनेकांच्या बाबतीत झाले आहेत. याबाबत कुठे दाद मागायची याची माहिती देखील यातील अनेक तरुणांना नाही, असे त्यांच्याशी सहज संवाद साधताना जाणवते. असे अनेक तरुण डोळ्यात पाणी आणून आपल्याबाबत घडलेल्या प्रसंगाची माहिती देताना दिसतात.

त्या दोघांना मंगळवारपर्यंत कोठडी
नोकरीचे आमिष दाखवून ४३ तरुण व १७ तरुणींकडून सुमारे ७० हजार रुपये उकळून त्यांना कुठलीही नोकरी न देता फसवणूक करणाऱ्या ज्ञानेश्वर महादेव धायतडक (रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) व अवध कलिम बिनसाद (रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. आर्मीच्या जवानांप्रमाणे पेहराव करून इम्प्रेशन मारणाऱ्या या दोघांच्या मागे अशा प्रकारच्या उद्योगांत मोठी टोळी असावी व या भागाबरोबरच नाशिक, संभाजीनगर परिसरातही त्यांनी असे फसवणुकीचे प्रकार केले असावेत, असा पोलिसांचा कयास असून, त्यादृष्टीने रांजणगाव एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com