शिरूरला स्वीकृत सदस्यपदी चव्हाण, पाचर्णे, लोळगे

शिरूरला स्वीकृत सदस्यपदी चव्हाण, पाचर्णे, लोळगे

Published on

शिरूर, ता. १६ : शिरूर नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्य निवडीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपने राजकीय समतोल साधला. या पक्षांचे अनुक्रमे अमोल चव्हाण, अभिजित पाचर्णे व राजेंद्र लोळगे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाली.
नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या नगरसेवकांच्या पहिल्याच सभेत नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत नगरसेवक) निवडीची प्रक्रिया पार पडली. नगरपरिषदेतील राजकीय संख्याबळाच्या आधारे मतांचा कोटा ठरविण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अमोल दादासाहेब चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अभिजीत गणेश पाचर्णे व भाजपकडून राजेंद्र अरूण लोळगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तीन जागांसाठी तीनच उमेदवारी अर्ज आल्याने चव्हाण, पाचर्णे व लोळगे यांची स्वीकृत सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याचे नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी जाहीर केले.
अमोल चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक चारमधून नगरपरिषदेची निवडणूक लढविली होती. अल्प मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. सूरजनगर मित्र मंडळाचे ते संस्थापक सदस्य असून, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. माजी आमदार अशोक पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या चव्हाण यांचे त्यांच्या कळवंतवाडी या मूळ गावातील विकासातही योगदान आहे. कळवंतवाडीचे सरपंच दादासाहेब चव्हाण हे त्यांचे वडील आहेत.
गेल्या कार्यकारिणीत नगरसेवक असलेले अभिजित पाचर्णे यांनी नगर परिषदेच्या बांधकाम, पाणीपुरवठा समित्यांचे सभापतिपदही भूषविले आहे. पाचर्णे मळा येथील गारपीर बाबा यात्रा समितीचे ते मुख्य संयोजक असून, माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. माजी उपनगराध्यक्ष (स्व.) गणेश पाचर्णे हे त्यांचे वडील, तर नवनिर्वाचीत नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे या त्यांच्या पत्नी आहेत.
राजेंद्र लोळगे हे माजी नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे यांचे पती असून, शिरूर शहर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. संत नरहरी सोनार जयंती उत्सव समितीचे ते प्रमुख असून, हलवाई चौक गणेश मंडळ, आझाद हिंद गणेश मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com