अमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटचा भांडाफोड
शिरूर, ता. २१ : पुणे-अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीवरील कुरुंद (ता. पारनेर) परिसरात शिरूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त छापे टाकून तब्बल २० कोटी रुपये किमतीचे १० किलो एमडी मॅफेड्रॉन जप्त करून अमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटचा भंडाफोड केला.
श्याम सुंदर गुजर (रा. नेप्ती, ता. अहिल्यानगर) असे या रॅकेटच्या सूत्रधाराचे नाव असून तो अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत पोलिस हवालदार म्हणून कार्यरत आहे. त्याच्यासोबत ड्रग्जचा माल पुरवणारा ज्ञानेश्वर बाळू शिंदे (रा. कोहकडी, ता. पारनेर) यालाही अटक करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, शनिवारी (ता. १७) मध्यरात्री शिरूरच्या बाबूरावनगर परिसरात पोलिसांनी छापा टाकून दोन कोटी दहा लाख रुपये किमतीचे मॅफेड्रॉन जप्त केले होते. याप्रकरणी शाबाद शेख (रा. शिरूर) याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांच्या पथकाने कुरुंद येथे छापे टाकत तब्बल दहा किलो मॅफेड्रॉन हस्तगत केले.
पोलिस हवालदारच ड्रग्स साखळीचा सूत्रधार
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिस हवालदार श्याम सुंदर गुजर हा या साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. ज्ञानेश्वर शिंदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात तर शाबाद शेख व अन्य माध्यमातून हे ड्रग्ज महाविद्यालयीन तरुणाईपर्यंत पोहोचवले जात होते. ही तस्करी केवळ जिल्ह्यापुरती मर्यादित नसून आंतरजिल्हा व आंतरराज्य नेटवर्कशी जोडलेली असल्याची दाट शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, गुन्हेगारांवर कारवाई करणाऱ्या यंत्रणेत बसूनच गुजर अमली पदार्थांच्या तस्करीला संरक्षण देत माहिती पुरवत असल्याचे ठोस पुराव्यांच्या माध्यमातून समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास अधिक खोलवर सुरू असून आणखी महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

