शिरूरमध्ये नेत्यांचे मनोमिलन, कार्यकर्ते मात्र त्वेषातच

शिरूरमध्ये नेत्यांचे मनोमिलन, कार्यकर्ते मात्र त्वेषातच

Published on

शिरूर, ता. २२ : शिरूरमध्ये माऊली कटके व अशोक पवार या आजी- माजी आमदारांत विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेला उभा दावा दोन्ही राष्ट्रवादीतील जवळीकीमुळे संपत आल्याचे चित्र असले; तरी विधानसभेपासून आत्तापर्यंत प्रत्येक निवडणुकीत त्वेषाने लढलेल्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांतील टशन जशीच्या तशीच आहे. त्यामुळे स्थानिक मनोमिलनाअभावी प्रत्येक गटात निवडणुकीच्या आखाड्यात जोरदार घमासान दिसत आहे. मोठ्या प्रमाणातील पक्षांतरे आणि बरेच मोठे मासे गळाला लागल्याने कधी नव्हे ते भाजपचे कमळ प्रत्येक गटांत दिसत आहे.
या निवडणुकीत महायुती विखुरल्याचे चित्र असून, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह कॉंग्रेसचे नामोनिशाण संपल्यात जमा आहे. वरिष्ठ पातळीवरील कोअर कमिटीच्या नेत्यांध्ये ठरल्यानुसार दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार ‘घड्याळ’ या चिन्हावरच लढणार असून, जिल्हा परिषदेच्या शिरूर- हवेली मतदारसंघातील गटनिहाय उमेदवार ठरविण्याचे अधिकार माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व आमदार माउली कटके आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे व माजी आमदार अशोक पवार यांच्यात विभागून देण्यात आल्याचे समजते. मात्र, स्थानिक पातळीवर मनोमिलन झालेले नसल्याने दोन्ही बाजूंच्या उमेदवारांना राष्ट्रवादीअंतर्गत परस्परविरोधी मतप्रवाह असलेल्या कार्यकर्त्यांच्या रोषाचा आणि विरोधाचा सामना करताना विरोधी पक्षाच्या उमेदवाराशी झुंजावे लागणार आहे.
दोन्ही राष्ट्रवादीतील जागावाटपासून ते उमेदवार ठरविण्यापर्यंतचा अंतर्गत कलह अजिबात शमलेला नसताना तो निवळण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना जातीने लक्ष घालावे लागणार आहे. त्यादृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार पुढाकार घेणार असून, उमेदवारी अर्ज माघारीच्या मुदतीपर्यंत हा पक्षांतर्गत कलह मिटविण्यासाठी ते दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांशी समन्वय साधणार आहेत. त्यादृष्टीने उद्यापासून पुण्यात त्यांच्या बैठकांचा धडाका सुरू होणार आहे.
वडगाव रासाई- मांडवगण फराटा गट इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असून माजी जिल्हा परिषद सदस्या सुजाता अशोक पवार या वरिष्ठांच्या निर्णयानूसार घड्याळ चिन्हावर मैदानात उतरल्या असताना माऊली कटकेंच्या विजयासाठी जिवाचे रान करणारे आणि अशोक पवारांच्या विरोधात रान उठविणारे पूर्व भागातील राष्ट्रवादीचे नेते दादा पाटील फराटे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक सुधीर फराटे यांनी त्यांच्या उमेदवारीला टोकाचा विरोध सुरू केला आहे. स्वतः दादा पाटील फराटे हे राष्ट्रवादीतील दोघांना सोबत घेऊन स्थानिक आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. माजी आमदार अशोक पवार यांना घेरण्यासाठी भाजपने त्यांचे गाव असलेल्या वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार यांना उमेदवारी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपने एक पाऊल पुढे टाकले असून, दिवंगत माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे यांना शिरूर- न्हावरे गटातून मैदानात उतरवून राजकीय भूकंप घडविला आहे. त्यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार देताना राष्ट्रवादीच्या नाकीनऊ आल्याचे चित्र असून, ऐनवेळी तृप्ती सरोदे या आक्रमक महिला नेत्याला डावलून वृषाली बबन वाळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी आमदार पोपटराव गावडे यांचे पुत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे व माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांना पक्षप्रवेशासह अनुक्रमे टाकळी- कवठे व रांजणगाव- कारेगाव गटातून उमेदवारी देऊन पुढचे पाऊल टाकले आहे. मात्र, तळेगाव- रांजणगाव सांडस गटात भाजपलाही बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. आमदार बापूसाहेब पठारे यांची कन्या दिपाली राहुल गव्हाणे यांना भाजपची उमेदवारी मिळाल्याने संतप्त झालेल्या आणि निवडणुकीसाठी मोठी पूर्वतयारी केलेल्या भाजपचे तालुकाध्यक्ष जयेश शिंदे यांनी पत्नी रेश्मा यांना अपक्ष मैदानात उतरविले आहे.
तळेगाव या मोठ्या गावातील कुणालाही उमेदवारी द्या, अशी एकमुखी मागणी असतानाही राष्ट्रवादीने तळेगावकरांची मागणी धुडकावत रेखा मंगलदास बांदल यांचीच उमेदवारी कायम ठेवली आहे. शिक्रापूर- सणसवाडीमध्ये मोठी रस्सीखेच असताना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळविण्यात मोनिका हरगुडे यशस्वी ठरल्या. त्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्या कुसूम मांढरे यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. भाजपकडून कुसूम खैरेंना उमेदवारी मिळाल्याने या गटातही तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे.
टाकळी हाजी- कवठे येमाई गटात आता भाजपचे राजेंद्र गावडे, राष्ट्रवादीचे दामू घोडे, शिवसेनेचे डॉ. सुभाष पोकळे व शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळासाहेब डांगे यांच्यात चौरंगी लढत होणार असली तरी गावडे आणि घोडे यांच्या विजयाचे गणित कोण बिघडवणार, याकडेही राजकीय धुरीणांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे प्रमुख उमेदवारांकडून इतरांना माघार घ्यायला लावण्याऐवजी मतविभागणीसाठी स्वतःला पूरक ठरणाऱ्या उमेदवारीला खतपाणी घातले जात आहे.
रांजणगाव- कारेगाव गटात राष्ट्रवादीच्या ज्योती पाचुंदकर व भाजपच्या स्वाती पाचुंदकर या जावांच्या ‘हाय व्होल्टेज’ लढतीत आता पाचुंदकर कन्येने उडी घेतली आहे. युवासेनेचे जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे यांच्या पत्नी अर्चना यांनी हाती घेतलेल्या धनुष्यबाणाच्या टणत्काराने कुठल्या जावेचे विजयाचे समीकरण बिघडणार की अनपेक्षितपणे त्याच बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. पाबळ- केंदूर गटात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल शिवले विरूद्ध भाजपचे विकास गायकवाड यांच्यात सरळ सामना आहे. सात अपक्ष रिंगणात असले तरी ते कुणाला साधक आणि कुणाला बाधक ठरणार हे उमेदवारी अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे.

महायुती, महाआघाडी दूभंगली
नगरपरिषद व महापालिका निवडणूकानंतर जिल्हा परिषद- पंचायत समितीच्या या निवडणूकीतही महायुती आणि महाआघाडी दूभंगली असून, दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आल्या असल्या तरी भाजप, शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्वबळाचा नारा देत आपापल्या चिन्हावर उमेदवार मैदानात उतरविले आहेत. शिरूर- न्हावरे, टाकळी- कवठे व कारेगाव- रांजणगाव गटात कमळ, घड्याळासह धनुष्यबाणावर उमेदवार उभे असून, तिरंगी लढतींमध्ये अनपेक्षित निकालांची देखील शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काही गट- गणांत मशाल पेटती ठेवली असून, महापालिका व नगर परिषद निवडणूकीत दिसणारी तुतारी वाजविणारा माणूस व हाताचा पंजा ही चिन्हे गायब झाली आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com