शिरूरमध्ये रामलिंग महाराजांचा यात्रा महोत्सव
शिरूर, ता. १६ : शिरूर शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री रामलिंग महाराजांच्या यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व मनोरंजनाच्या उपक्रमांचे आयोजन केले होते. महाशिवरात्रीचे औचित्य साधून पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातील शिवभक्तांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दिवसभरात सुमारे दीड लाखाहून अधिक भाविकांनी श्री रामलिंगाचे दर्शन घेतल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले.
दरवर्षी महाशिवरात्रीला या देवस्थानची यात्रा भरते. या मंदिरातील शिवलिंगाची प्रतिष्ठापना खुद्द प्रभू श्री रामचंद्रांनी केल्याची आख्यायिका आहे. पालखी सोहळ्याने सुरू होणारा या देवस्थानचा हा यात्रा महोत्सव तीन दिवस चालतो. त्यानुसार शिरूर शहरात पालखीची ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक झाल्यानंतर महाशिवरात्रीला यात्रेच्या मुख्य दिवशी हर हर महादेवच्या गजरात प्रवेशद्वारावर भगवे निशाण उभारण्यात आले. मंदिरातील शिवलिंगाला नुकताच वज्रलेप केला असून, गाभाऱ्याला आतील बाजूने सोन्याचा वर्ख चढविला आहे.
शहरातून ग्रामप्रदक्षिणेनंतर पालखीचे जुन्या शिरूर येथील रामलिंग मंदिरात आगमन झाल्यानंतर ‘रामलिंग महाराज की जय’चा गजर झाला. पहाटे साडेचारच्या सुमारास रामलिंग मंदिरातील शिवलिंगावर पंचगंगेच्या पवित्र जलाने महारुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल व दिना धारिवाल तसेच इंदूर येथील उद्योजक रोहित मेहता व साक्षी मेहता यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आदित्य धारिवाल यांच्या हस्ते आरती झाली. देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त तुळशीराम परदेशी, खजिनदार पोपटराव दसगुडे तसेच गोदाजी घावटे, रावसाहेब घावटे, वाल्मिकराव कुरंदळे, बलदेवसिंग परदेशी, नामदेवराव घावटे, जगन्नाथ पाचर्णे व बबनराव कर्डिले या विश्वस्तांसह शहर व पंचक्रोशीतील भाविक यावेळी उपस्थित होते. यात्रेकरूंना व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने प्रकाश धारिवाल यांनी देवस्थानसाठी स्वखर्चातून आरओ प्लांट बसवून दिल्याची माहिती दसगुडे यांनी दिली.
यात्रेनिमित्त मंदिर परिसरात पाळणे, लहान मुलांसाठी खेळणी, घोडागाडी आदी खेळ आले होते. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाने प्रदर्शनी स्टॉल लावला होता. याठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांचे चित्रांद्वारे दर्शन घडविण्यात आले. तसेच ज्योतिर्लिंगांविषयीची माहिती व महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व देखील भाविकांना सांगण्यात आले. इस्कॉनसह काही आध्यात्मिक संस्थांनी धार्मिक ग्रंथ विक्रीसाठी स्टॉल लावले होते. दरम्यान, मंदिर प्रांगणात चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. त्यानंतर कानिफनाथ भजनी मंडळाच्या महिलांनी दिवसभर शिवमहात्म्यावर आधारीत भजने म्हटली. अहिल्यानगर येथील राऊत बंधूंच्या सनई वादनाची; तसेच दिनकर पाडळे व सहकाऱ्यांच्या भजन सेवेची सांगताही यावेळी झाली.
शिरूर बसस्थानकावरून रामलिंग मंदिरापर्यंत दर दहा मिनिटाला एसटी बसची सोय केली होती. या बससुविधेचा अनेक भाविकांनी लाभ घेतला. यात्राकाळातील गडबड, गोंधळ टाळण्यासाठी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, उपनिरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात व मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर पोलिस बंदोबस्त लावला होता. सोमवारी (ता. १६) बैलगाडा शर्यतीने रामलिंग महाराज यात्रा महोत्सवाची सांगता झाली.
जुगलबंदी रंगली
रात्री मंदिर परिसरात शोभेचे दारूकाम झाले. खर्डा (ता. जामखेड) व गेवराई येथील दोन पार्ट्यांमध्ये शोभेचे दारूकाम दाखविण्यावरून जुगलबंदी रंगली. रात्री नृत्य स्पर्धा झाल्या. या स्पर्धांमध्ये शिरूर शहर व परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत समूहनृत्य सादर केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

