शिरूरमध्ये हातचलाखीने 
अंगठ्या लांबविल्या

शिरूरमध्ये हातचलाखीने अंगठ्या लांबविल्या

Published on

शिरूर, ता. १५ : ‘या परिसरात चोऱ्या होत असून, आत्ताच इथून चोरटे पळालेत. त्यामुळे तपासणी चालू असून, बोटातील सोन्याच्या अंगठ्या किंवा दागिने काढून खिशात ठेवा’, असे सांगत दोघा चोरट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करून दुचाकीवरून चाललेल्या प्रवाशाचा विश्वास संपादन केला व बोलण्यात गुंतवून सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या हातोहात लांबविल्या.
पुणे-नगर रस्त्यावरील जोशीवाडी परिसरातील एका रुग्णालयाजवळ बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. वाडेगव्हाण (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथील ५५ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी तीन चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
दुचाकीवरून शिरूर शहरात येत असलेल्या फिर्यादीस जोशीवाडी परिसरात पोलिस असल्याची बतावणी करत दोघांनी अडविले. त्यावेळी तेथे आणखी एका दुचाकीस्वाराच्या हातातील अंगठ्या या दोघांनी काढून त्यांना रुमालात बांधून दिल्या व जाण्यास सांगितले. या परिसरात चोऱ्या होत असून, चोरटे पळाले असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही तपासणी करत आहोत. तुम्ही तुमच्या बोटातील सोन्याच्या अंगठ्या काढून खिशात ठेवा असे सांगत त्यांनी त्यांच्याजवळील रुमाल दुचाकीस्वाराला दिला. त्यावेळी बोलण्यात गुंगवून त्यांच्या बोटातील प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या काढल्या व रुमालात बांधण्याचे नाटक केले आणि फिर्यादीच्या खिशात रुमाल कोंबून ते निघून गेले. मात्र पुढे गेल्यावर दुचाकीस्वार फिर्यादीने रुमाल काढून पाहिला असता, त्यात काहीच नव्हते. हातचलाखीने चोरट्यांनी अंगठ्या लांबविल्याचे लक्षात आल्यावर त्याने शिरूर पोलिसांकडे धाव घेतली.
याप्रकरणी शिरूर पोलिसांनी लूटमारीचा गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com