मजबूत बंधुभावामुळे देशवासीय आनंदात

मजबूत बंधुभावामुळे देशवासीय आनंदात

Published on

शिरूर, ता. ३ : ‘‘आज अनेक देश परस्परांत लढत असताना, आपापसांतील भांडण आणि कारवायांनी अनेक देशांचे जीवनमान अस्वस्थ झालेले असताना आपले देशवासीय आनंदाने, उत्साहाने होळीचा सण साजरा करीत आहेत. परस्पर सौहार्द, विभिन्न भाषा असूनही एकतेची भावना, मजबूत बंधुभाव आणि संस्कारांनी दिलेल्या संस्कृतीमुळेच हे घडत आहे,’’ असे प्रतिपादन आंतराराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी येथे केले. आमची संस्कृती आम्हाला आपापसात लढायला नव्हे; तर एकदुसऱ्यांप्रती आदरभाव, प्रेमभाव ठेवायला आणि थोरांप्रती नतमस्तक व्हायला शिकविते, असेही ते म्हणाले.
उद्योगपती (स्व.) रसिकलाल धारिवाल व त्यांच्या पत्नी (स्व.) कमलबाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पी. आर. धारिवाल फाऊंडेशनच्या वतीने आयोजिलेल्या श्री शिवमहापुराण कथासोहळ्याची मंगळवारी (ता. ३) उत्साहात सांगता झाली. श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल व त्यांच्या पत्नी दीना यांनी यावेळी पोथीपूजन केले. आमदार माउली कटके, माजी आमदार अशोक पवार, अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरणताई वळसे पाटील, शिरूरच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, शिरूर ग्रामीणच्या सरपंच शिल्पा गायकवाड, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी अध्यक्ष देवदत्त निकम, सॅबेस्टियन गुडीनो एज्युकेशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा नॅन्सी पायस, बालाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पवार, प्रवीण दसगुडे, संतोष शितोळे, लक्ष्मीकांत खाबिया, विनोद धाडिवाल, सुभाष गांधी आदी यावेळी उपस्थित होते.
पंडित मिश्रा यांनी श्रद्धा, विश्वास आणि सदाचार यांचा संदेश देत शिवभक्तांच्या अंतःकरणात अध्यात्माची आणि सकारात्मकतेची ज्योत प्रज्ज्वलित केली. श्रद्धा आणि विश्वासाने शिवपुराणाचे श्रवण केल्यास निश्चितच चांगले फळ मिळते, असे नमूद करून ते म्हणाले, ‘‘फुकाचा अभिमान, बुद्धीतील अहंभाव आणि मनातील अहंकार प्रयत्नपूर्वक कमी करताना समर्पण भाव जपण्याचा, विचारांची उंची वाढविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा.’’
या सोहळ्याचे प्रायोजक श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. हा केवळ धार्मिक सोहळा नव्हता तर समाजाला सदाचार, संयम व भक्तीचा मार्ग दाखविणारा उपक्रम होता, असे ते म्हणाले. आशीष वर्मा यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगरसेवक विजय दुगड यांनी आभार मानले.
संघपती भरत चोरडिया, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, प्रशांत शिंदे, तुकाराम खोले, प्रवीण दसगुडे, किरण पठारे, अभिजित पाचर्णे, नीलेश गाडेकर, शरद कालेवार, रवी गोसावी, सनी जाधव, विठ्ठल पवार, दिनकर साबळे, विठ्ठल घावटे, संतोष कडेकर, आशीष नहार, गणेश पठारे, प्रशांत गादिया, अविनाश घोगरे, सुशांत कुटे, नीलेश जाधव, पवन गांधी, किरण बनकर, सुनील बोरा, नीलेश लटांबळे, योगेश जामदार, राजेंद्र लोळगे, अमोल चव्हाण, प्रकाश बाफणा, अक्षय रासने, प्रीतेश कोठारी, प्रशांत संचेती, सचिन धाडीवाल, प्रमोद सागवेकर, मयूर नहार, विशाल जोगदंड, दीपक तंटक, मुकुंद मुसळे, विजय खोसे, डॉ. संतोष पोटे, डाॅ. रवीन बोरा, सुभाष गांधी, मयूर कालेवार, शशिकला काळे, उर्मिला फलके, हौसाबाई अडसूळ, सविता दारोळे आदींनी या सोहळ्याच्या यशस्वी संयोजनात योगदान दिले.

शिरूर येथील धारिवाल परिवार शिवशंकराच्या सेवेत समर्पित आहे. प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेल्या श्री रामलिंग महाराज देवस्थानच्या विकासात (स्व.) रसिकलाल धारिवाल यांनी दिलेले योगदान हे महान पुण्यकर्म आहे. त्यांनी स्वकष्टातून धनदौलत कमविली. त्याचबरोबर सामाजिक, धार्मिक कार्यातून दुवा प्राप्त केली. विविध ठिकाणी त्यांनी आपल्या कमाईतून रूग्णालये, धर्मशाळा व वृद्धाश्रमांची उभारणी केली. जनकल्याणाचे त्यांचे हे कार्य आदर्शवत आहे.
- पंडित प्रदीपजी मिश्रा


इतर उपक्रम
- (स्व.) रसिकलाल धारिवाल व (स्व.) ज्ञानदेव पठारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पठारे परिवाराकडून पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या श्री विठ्ठलेश सेवा समितीला दुचाकी भेट.
- श्री शिवपुराण कथासोहळ्याच्या यशस्वी संयोजनाबद्दल प्रकाश धारिवाल व आदित्य धारिवाल यांचा येथील रसिक विचार मंचाकडून मानपत्र देऊन गौरव.
- श्री शिवमहापुराण कथासोहळ्यादरम्यान, हरी मेंदरकर व सौरभ मास्तोळी यांच्या पथकाकडून भजन सेवा.
- ऊर्जा उद्योग समूहाचे प्रमुख प्रकाश कुतवळ, नगरसेवक अमित कर्डिले व ऍक्सिस बॅंकेकडून शिवभक्तांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com