शिरूरमध्ये रस्त्यासाठी शेतकरी कुटुंबाचे उपोषण

शिरूरमध्ये रस्त्यासाठी शेतकरी कुटुंबाचे उपोषण
Published on

शिरूर, ता. ११ : शेतात जाण्यासाठी मंजूर रस्ता पाच वर्षे होऊनही खुला मिळत नसल्यामुळे शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील एकाच कुटुंबातील चार सदस्य गेल्या तीन दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. यामध्ये दोन ज्येष्ठ महिला आणि एका कर्करोगग्रस्ताचा समावेश असून, रस्ता मिळेपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
अनिल बाळासाहेब लगड, शकुंतला बाळासाहेब लगड, नानासाहेब दत्तात्रेय लगड व अंजना दत्तात्रेय लगड (सर्व रा. धुमाळवाडी, शिरसगाव काटा, ता. शिरूर) अशी उपोषणकर्त्यांची नावे आहेत. ३ फेब्रुवारी २०२० रोजी रस्ता मंजूर होऊनही, पोलिस बंदोबस्त आणि जेसीबीचा खर्च करूनही प्रशासकीय पातळीवर टाळाटाळ होत असल्याचा आरोप अनिल लगड यांनी केला. प्रतिवादी अपिलात गेल्याचे कारण सांगून रस्ता रोखला जात असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी प्रांताधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आणि पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती प्रशासनाने केली. मात्र, ठोस निर्णय झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, या भूमिकेवर शेतकरी कुटुंब ठाम राहिले. दरम्यान, गुरुवारी (ता. १२) स्थळपाहणी करून निर्णय घेऊ, असे तहसीलदार म्हस्के यांनी स्पष्ट केले. उपोषणस्थळी काही स्थानिकांनी दमदाटी केल्याची तक्रारही यावेळी महिलांनी केली.

रस्ता मिळण्यासाठी आम्ही गेले पाच वर्षे वाट पाहिली. शासन दरबारी अनेक हेलपाटे मारून पाठपुरावा केला. मात्र, काही लोक जाणूनबुजून रस्ता मिळण्यात अडथळे आणीत आहेत. याबाबत सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी.
- अनिल लगड, उपोषणकर्ते शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com