भंडाऱ्याच्या उधळणीत परंपरेचा जल्लोष

भंडाऱ्याच्या उधळणीत परंपरेचा जल्लोष
Published on

शिरूर, ता. १ : ‘नाथसाहेबांचं चांगभलं’, ‘भैरोबाचा उदोउदो’च्या आसमंत दणाणून सोडणाऱ्या ललकाऱ्या... पारंपरिक वाद्यांचा मर्दानी बाज... ढोल-ताशांचा गजर... ठिकठिकाणी नाचविला जाणारा छबीना अन् भंडाऱ्याची मुक्त उधळण... शिरूर पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री भैरवनाथांच्या बगाड यात्रेला आज गाडीबगाडाच्या मिरवणुकीने सुरुवात झाली.
जुने शिरूर येथील भैरवनाथ मंदिरापासून रणरणत्या उन्हात निघालेल्या बगाडासोबत पंचक्रोशीतील अबालवृद्ध सहभागी झाले होते. आज सकाळी श्री देव्हडेश्‍वर मंदिरापासून कावड आल्यानंतर भैरवनाथ मंदिरासमोर गाडे-बगाड फुलमाळांनी सजविण्यात आले. भगवे निशाण फडकावल्यानंतर कडाकण्या, पुऱ्यांचे हार घातले. शेला-पागोटे बांधून देवाला मान दिल्यानंतर दुपारी बारा वाजता देवाची धुणी उधळताच बगाड हलले. अभंग मंडळींनी ‘नाथसाहेबांचे चांगभले’च्या जयघोषात बगाड पुढे नेले. पंचायत समितीच्या सभापती स्वाती घावटे, श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे रावसाहेब घावटे, पोपटराव दसगुडे, नामदेव घावटे, अरुण घावटे, नामदेव जाधव, सरपंच शिल्पा गायकवाड, उपसरपंच सचिन घावटे यावेळी उपस्थित होते. किरण घावटे यांनी देवस्थानच्या वतीने उपस्थितांचे स्वागत केले.
रणरणत्या उन्हात, शेतांतून, बांधावरून, झाडाझुडपांतून दुपारी चारच्या सुमारास बगाड शिरूर बायपासवरील दत्तमंदिराजवळ आल्यानंतर वाद्यांच्या गजरात तरूणांनी छबिना नाचविला. तर्डोबावाडीच्या शिवेवर वाडीकर मंडळींनी वऱ्हाडी मंडळींचा पानसुपारी देऊन मानसन्मान केला. शहर व पंचक्रोशीतील नागरीकांनी बगाडाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. कडाणीचा अवघड डोंगर उतरून बगाड तर्डोबाची वाडीत पोचल्यावर काळभैरव पालखी घेऊन बंधूभेटीसाठी आले. मंदिर परिसरात बगाड विसावल्यावर पालखीतून देवाला मंदिरात नेले. तेथे वाद्यांच्या गजरात, मंगलाष्टकांच्या सुरांमध्ये भैरवनाथ-जोगेश्‍वरीचा विवाह संपन्न झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com