

शिरूर, ता. ११ : शिरूर आणि वेल्हे परिसरात भरदिवसा महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या दोन वेगवेगळ्या टोळ्यांतील चार सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शिरूरमधील बागवान नगर परिसरात २९ मार्चला एका महिलेचे सहा तोळे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस पथकाने १४५ किलोमीटर अंतरातील तब्बल ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे अनिल गोरखनाथ म्हस्के (वय ३३) व अभिजित सुभाष रॉय (वय २६, दोघे रा. चिखली, पिंपरी-चिंचवड) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून साडेतीन तोळ्यांचे दागिने जप्त करण्यात आले असून, त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.
दुसऱ्या कारवाईत, वेल्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५ ऑगस्टला राहुल कोंढरे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून १८ तोळे दागिने लुटणाऱ्या टोळीचा छडा लावला. याप्रकरणी अभिजित सचिन खुटवड (वय २३) व प्रसाद सतीश शिंदे (वय २१, दोघे रा. कात्रज) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली.