
उज्जैनमध्ये पुरंदर-हवेलीतील १० कावडींची मिरवणूक
सासवड, ता.२५ : श्रीक्षेत्र उज्जैन येथील श्री महाकालेश्वर महादेव येथे पुरंदर-हवेली परिसरातील शंभू महादेवाच्या मानाच्या १० कावडींची काल (ता.२४) मिरवणूक काढण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांनी पुष्पवृष्टी केली व मानाच्या कावडी तसेच शंभूभक्तांचे स्वागत केले. कावडींच्या महाराजांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे श्रीक्षेत्र उज्जैनला लोकरंग व भक्तिरंग पाहण्यास मिळाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.
कावड यात्रेचे आयोजक पुरंदर - हवेलीचे आमदार संजय जगताप यांची यावेळी मुख्य उपस्थिती होती. स्व. माजी आमदार चंदुकाका जगताप मित्र परिवाराच्या वतीने आणि आमदार जगताप यांच्या संकल्पनेतून बारा जोतिर्लिंग कावड यात्रा सुरू केली आहे. या उपक्रमाअंतर्गत मंगळवारी रात्री सासवड येथून १० कावडींचे सुमारे चार हजार शंभूभक्तांसह यात्रेसाठी प्रस्थान झाले. बुधवारी (ता.२२) पहाटे यात्रा परळी वैजनाथ, गुरुवारी औंढा नागनाथ येथे तर शुक्रवारी (ता.२४) उज्जैन महाकालेश्वर येथे पोहोचली. या सर्व ठिकाणी महादेव मंदिरापर्यंत फटाक्यांच्या आतषबाजीत आणि हलगीच्या निनादात भव्य मिरवणुकीने शंभू महादेवांचे दर्शन कावडींनी व सोबतच्या भक्तांनी घेतले. याचवेळी शिवाच्या पिंडींवर क-हा नदीच्या पाण्याचा जलाभिषेक करून आणि महाआरती संपन्न झाली.
पुरंदर तालुक्यातील सासवड, खळद, बेलसर, शिवरी, भिवरी, कोळविहिरे, मावडी क. प., मावडी सुपे, राजुरी व हवेली तालुक्यातील फुरसुंगी येथील शंभू महादेवाच्या मानाच्या १० कावडींचा यात समावेश आहे. यावेळी उज्जैनमध्ये जगताप यांच्यासह सासवडचे सुपुत्र व सनदी अधिकारी तथा महू कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, संत भूतोजीबुवा तेली कावडीचे महाराज कैलासबुवा कावडे, खळदचे नाना महाराज खळदकर, माजी उपनगराध्यक्ष यशवंतकाका जगताप, सुहास लांडगे, विजय वढणे, अजित जगताप, संजय हरपळे, संजयनाना जगताप, संजय आंबेकर, रोहित इनामके, संदीप राऊत, सासवडचे गावपाटील संग्राम जगताप, संजय द. जगताप, नगरसेवक प्रवीण भोंडे, मित्र परिवाराचे पदाधिकारी रवींद्रपंत जगताप, सचिन कुंजीर, संदीप जगताप, सागर घाटगे, रवी जगताप आदींसह दहा गावांतील यात्रेकरू उपस्थित होते.
03338