
सासवड शहराची वाटचाल सोलर सिटीकडे ः मोरे
सासवड, ता. १९ : ‘शहरातील नगरपरिषदेच्या मालकीच्या सर्व इमारतींवर सोलर यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सोलर सिटी व इलेक्ट्रीकल वाहनांची सिटी म्हणून सासवड शहराची वाटचाल करण्यावर भर आहे. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी अपारंपारिक उर्जा स्रोतांचा वापर शहरातील नागरिकांनी करावा,’ असे आवाहन सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले. इलेक्ट्रिकल वाहनांचा मेळावा व ती वापरणाऱ्यांचा सन्मानपत्र देत सन्मान सोहळा नगरपरिषदेच्या प्रांगणात झाला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मोरे बोलत होते.
सासवड नगरपरिषदेमार्फत ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत नगरपरिषद हद्दीतील इलेक्ट्रिकल चारचाकी व दुचाकी वाहनांच्या महामेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. माझी वसुंधरेच्या जल, भूमी, वायू, अग्नी आणि आकाश या पंचतत्वाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रचार, प्रसार व लोकजागृतीसाठी सासवड नगरपरिषद कायम तत्पर राहत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अगोदर इलेक्ट्रिकल दुचाकींच्या रॅलीचे आयोजन केले होते, तर आता इलेक्ट्रिकल वाहनांचा मेळावा व ती वापरणाऱ्यांचा सन्मान सोहळा घेण्यात आला.
यावेळी इलेक्ट्रीकल व्हेईकल मेळाव्यात ३ चारचाकी वाहनांनी आणि ५५ इलेक्ट्रीकल दुचाकींनी सहभाग नोंदविला. महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. यामध्ये धनश्री सोनावणे, डॉ. सुप्रिया गद्रे, स्नेहलता बोरावके, स्वाती भारती, सुरेखा जाधव, श्रीमती खळदकर आदी अनेक महिला दुचाकींसह सहभाग झाल्या होत्या.
मेळाव्यामध्ये सहभाग घेतलेल्या सर्व वाहनधारकांना सासवड नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी मोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी नगरपरिषद कार्यालय अधीक्षक संदेश मांगडे, आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण, पाणी पुरवठा अभियंता रामानंद कळस्कर, वरिष्ठ लिपीक संजय पवार, शहर स्वच्छता समन्वयक राम कारंडे, माजी नगरसेवक अजित जगताप, निवृत्त बँक अधिकारी हेमंत ताकवले, ज्ञानेश्वर गिरमे, मोहन जगताप, सुनिल जगताप, चेतन महाजन, संदिप जगताप, भूषण मचाले, अमित बहिरट, रवी पोटे, मंत्री जगताप आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मोरे मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘‘शहरातील जास्तीत जास्त नागरीकांनी इलेक्ट्रीकल वाहनांचा वापर करावा. त्यासाठी नगरपरिषदेच्यामार्फत जास्तीत जास्त सोयीसुविधा पुरविण्यात येतील. यामध्ये सामाजिक दायित्व निधीद्वारे (सीएसआर) जबाबदारी म्हणून सोलर चार्जिंग पॉईंट बसविण्यात येणार आहे. अगोदर दोन ठिकाणी चार्जिंग पॉईंट बसविले आहेत. त्यात भर घातली जाईल. त्याचा फायदा इलेक्ट्रीकल वाहन मोफत चार्जिंगसाठी होणार आहे.
आरोग्य विभाग प्रमुख चव्हाण यांनी सांगितले की, सासवड शहर हद्दीत नदी परिसर, सोनोरीमार्ग, वाघडोंगर व सोपानगर मार्ग व लगतच्या मोकळ्या जागांत कचरा उघड्यावर गुपचुप टाकण्याचे प्रकार दिसतात. ज्यांची घंटागाडीची वेळ चुकते, त्यांनी विशेषतः याबाबत खबरदारी घ्यावी आणि कचरा संकलीत करुन घंटागाडीतच कचरा टाकावा. अन्यथा संबंधितांवर एक हजार रुपयांप्रमाणे प्रत्येक वेळी दंड आकारण्यात येईल. त्यासाठी फिरती पथके तयार केली आहेत.
---------------------
वसुंधरेचे संरक्षण व संवर्धन करणे, ही प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे आणि ते वृक्ष जगविणे आवश्यक आहे. याबाबत जनजागृती गरजेची आहे. - निखील मोरे, मुख्याधिकारी, सासवड नगरपालिका
--------