पुरंदरमधील सीताफळाचा उन्हाळी बहार धोक्यात
सासवड, ता.२७ : पुरंदर तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसामुळे अंजीर, आंबा, जांभूळ या फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर सततच्या संततधारेमुळे सीताफळाचा उन्हाळी बहार धोक्यात आला आहे. याबरोबरच मिरची, टोमॅटो, फ्लॉवर आदी भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुरंदरमध्ये अंजीराचा मीठा बहार उरकत आला असतानाच सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे फळांचे नुकसान झाले आहे. अधिक पाण्यामुळे फळांची गोडी जावून तुरटपणा आल्याने फळे बेचव झाली आहेत. जांभळाची फळे सडायला लागली आहेत. केशर आंब्याचीही मोठ्या प्रमाणात फळगळ झाली असून याचा फटका त्यांच्या दरांवर झाला आहे. तर उन्हाळी बहारातील सीताफळाची कळी काळी पडून गळाल्याने याचाही मोठा फटका सीताफळाच्या उत्पादनावर बसणार आहे.
सासवड येथील फळविक्रेते हरून बागवान यांनी सांगितले, की मान्सूनपूर्व पावसापूर्वी सासवडच्या फळ बाजारात अंजिराचे दररोज ३०० ते ४०० टब (घमेली) येत होती. प्रत्येक टबमध्ये ७ ते ८ किलो फळ बसतात व त्याला प्रतिटब ६०० ते १००० रुपये दर मिळत होता. आता हे प्रमाण ५० ते ६० टबवर आले असून २०० ते ४०० रुपये दर मिळत आहे.
आठवडाभर होत असलेल्या पावसामुळे अंजीरासह मिरची, टोमॅटो, फ्लावर आदी फळभाज्या व भाजीपाल्याचेही बुरशीजन्य रोगांमुळे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे औषधफवारणी करणेही शक्य होत नाही.
- दीपक काळे, सोनोरी, शेतकरी
बहाराची फळे जुलै-ऑगस्ट दरम्यान काढणीस तयार होतात. या काळात बाजारात चांगला दर मिळतो, त्यामुळे आर्थिक नफा जास्त होतो. मात्र या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर कळी काळी पडून गळाल्याने नुकसान झाले आहे. याबाबत कृषी सहाय्यकांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- सूरज जाधव, तालुका कृषी अधिकारी
नुकसानीबाबतही संपर्क साधण्याचे आवाहन
बहार उरकत आला असताना पावसामुळे नुकसान झाले आहे. याबाबतही नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना कृषी सहाय्यकांना दिल्या असल्याचेही सूरज जाधव यांनी सांगितले. याबरोबरच इतर नुकसानीबाबतही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
05004
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.