शिवसेना जिल्हाप्रमुखाने पिस्तूल रोखले
सासवड, ता. २७ : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप सोपान यादव आणि त्यांचा मुलगा विनय यादव यांच्यावर एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात पुतण्या आणि पुतणीला पिस्तूल रोखून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत केतकी धनंजय झेंडे यांनी सासवड (ता. पुरंदर) पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तसेच, विनय यादव यांनीही उलट फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी माहिती दिली की, झेंडे यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. २४ मे) सासवड-हडपसर रस्त्यावरील ‘महाराजा लॉन्स’ येथे झेंडे यांच्या चुलत भावाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम होता. तेथे चिनू ऊर्फ संकेत यादव यांनी, ‘१७ मे रोजी माझ्या लग्नाला दिलीप यादव यांचे कारण देऊन आले नाहीत, मग आज साखरपुड्याला कसे आलात?’ असे विचारत झेंडे यांच्या कुटुंबातील सदस्यांशी बाचाबाची केली. या घटनेनंतर दिलीप यादव, विनय यादव आणि त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्य झेंडे यांच्या भावांच्या अंगावर धावून गेल्या. अक्षता यादव, सुनीता यादव आणि शुभांगी दौंडकर यांनी झेंडे यांच्या भावांना मारहाण केली. केतकी झेंडे मध्यस्थी करण्यासाठी पुढे आल्या असता दिलीप यादव आणि विनय यादव यांनी त्यांना ढकलून दिले. त्यात त्यांच्या गळ्यातील सुमारे ३.३० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार गहाळ झाला. याचवेळी दिलीप यादव आणि विनय यादव यांनी पिस्तूल काढून झेंडे आणि त्यांच्या भावांवर रोखले आणि, ‘पुन्हा सासवडमध्ये दिसलात तर बघा’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. यापूर्वीही विनय आणि दिलीप यादव यांनी झेंडे यांच्या भावांना पिस्तूल दाखवून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये दिलीप यादव, विनय यादव यांसह अन्य १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
तर विनय दिलीप यादव यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत, त्यांच्या कुटुंबाचा जुना वाद असलेले सागर बाळासाहेब यादव, प्रसाद बाळासाहेब यादव आणि सुनील धर्मराज कोलते यांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली, असे म्हटले आहे. या तिघांवर सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. २४ मे रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास महाराजा लॉन्स येथे प्रथमेश अजित यादव यांच्या साखरपुडा समारंभानंतर घरी परतत असताना हा प्रकार घडला. सागर यादव, प्रसाद यादव आणि सुनील कोलते यांनी विनय यादव यांचे वडील दिलीप यादव यांना अडवले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी विनय यादव, त्यांची पत्नी अक्षता, आई सुनीता आणि बहीण शुभांगी भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले असता त्यांनाही मारहाण केली. सुनील कोलते यांनी विनय यांच्या आई सुनीता यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर प्रसाद आणि सागर यादव यांनी लोखंडी कड्याने मारहाण केल्याने विनय यादव यांच्या नाकाला जखम होऊन रक्त आले. या मारामारीत विनय यादव, त्यांचे वडील, आई, पत्नी आणि बहीण जखमी झाले आहेत. तसेच, सागर यादव आणि प्रसाद यादव यांनी विनय यांच्या पत्नी अक्षता यांना अश्लील शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेत विनय यादव यांच्या गळ्यातील अंदाजे तीन तोळे वजनाची सोन्याची चेन व त्यामधील पेंडंट कुठेतरी पडून गहाळ झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, दिलीप यादव हे आमदार विजय शिवतारे यांचे चुलत मेव्हणे आहेत, तर फिर्यादी केतकी झेंडे या शिवतारे यांच्या सख्ख्या भाची आहेत. कुटुंबातील हा जुना वाद साखरपुड्यासारख्या समारंभात चव्हाट्यावर आल्याने पुरंदर तालुक्यात चर्चा रंगली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

