पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा जगताप यांचा राजीनामा
सासवड, ता. १२ : पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय चंदुकाका जगताप यांनी शनिवारी (ता.१२) पदाचा तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
जगताप यांनी राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यालयाकडे ई-मेलद्वारे पाठवला आहे. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष संग्राम मोहोळ यांच्याकडेही राजीनामा पत्र सुपूर्द केले आहे. या राजीनाम्याची प्रत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनाही माहितीस्तव पाठवण्यात आली आहे. संजय जगताप यांच्या या निर्णयामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
येत्या बुधवारी भाजपमध्ये प्रवेश
काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप हे भारतीय जनता पक्षात येत्या बुधवारी (ता. १६) सासवड येथील पालखी तळावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या संभाव्य राजकीय बदलामुळे पुरंदरमधील अनेक वर्षांची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. विद्यमान आमदार विजय शिवतारे यांना यातून मोठे राजकीय आव्हान मिळण्याची शक्यता आहे. जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजप प्रवेशाबाबत उत्साह असून, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे केवळ पुरंदरच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, जगताप यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास हा काँग्रेसच्या विचारधारेतून घडला आहे. त्यांचे वडील, दिवंगत माजी आमदार चंदुकाका जगताप, हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते आणि त्यांनी आयुष्यभर काँग्रेसला वाढवले. सहकार आणि शैक्षणिक चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. ज्याचा प्रभाव संजय जगताप यांच्यावर आजही दिसून येतो.
उद्या संवाद मेळावा
सासवड येथे सोमवारी (ता. १४) माजी आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा होणार आहे. यामध्ये भूमिका स्पष्ट होईल, असे नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी सांगितले.
05261
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.