संघटीत टोळीविरूद्ध सासवड पोलिसांची कारवाई
सासवड, ता. ७ : सासवड पोलिसांनी नुकतेच ११ लाख ६५ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तिघांवर भारतीय न्याय संहिता कलम १११ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी संघटित गुन्हेगारीला मोठा धक्का दिला असल्याचे बोलले जात आहे.
सासवड पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ७ जून २०२५ रोजी राजगड पोलिसांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सासवड पोलिसांनी जेजुरी नाका येथे नाकाबंदी केली. यावेळी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला केशर युक्त विमल पान मसाला आणि गुटखा घेऊन जाणारे एक वाहन पकडण्यात आले. याप्रकरणी सिद्धेश्वर उत्तम काळे (वय १७), चेतन पांडुरंग खांडेकर (वय २२), बाबू धुळा काळे (वय २३, तिघे रा. सांगली) या तिघांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासामध्ये हे तिघे अनेक वर्षांपासून अशा प्रकारे संघटित टोळी सक्रिय करून गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, सासवड पोलिसांनी या आरोपींविरोधात ''संघटित टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करणे व नियंत्रण ठेवणे'' या कायद्याअंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १११ हे वाढीव कलम लावण्याचा प्रस्ताव पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता. पोलिस अधीक्षकांनी या प्रस्तावाला त्वरित मंजुरी दिली आहे, ज्यामुळे या टोळीविरुद्ध कठोर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.