सासवड, जेजुरीतील प्रलंबित विकासकामांचा आढावा
सासवड, ता. १० : नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत सासवड, जेजुरी आणि नवनिर्मित फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपालिकांमधील प्रलंबित विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी (ता. ९) बैठक झाली.
या बैठकीत प्रामुख्याने रस्ते, पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन आणि कर्मचारी कमतरता या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. या बैठकीत माजी आमदार संजय जगताप, भाजपचे पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष बाबा जाधवराव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. संजय जगताप यांनी सासवड आणि जेजुरीच्या प्रलंबित विकासकामांकडे मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यामध्ये भुयारी गटार योजना, पाणी पुरवठा योजना, बांधकामांचे निकष कमी करणे, जेजुरीची हद्दवाढ अशा प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता. फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपालिकेच्या व्यवस्थापनातील अडचणींवर चर्चा करताना कर आकारणी, १५वा वित्त आयोग आणि स्वच्छ भारत अभियानाचा निधी मिळवण्यासह पीएमआरडीए व पुणे महापालिकेकडून निधी देण्याची मागणी केली.
जेजुरी नगरपालिकेतील चाळीसगाव येथून आलेल्या ‘ड’ वर्ग कर्मचाऱ्यांचे जवळच्या नगरपालिकेत स्थलांतर करण्याबाबत चर्चा झाली. तसेच, या क आणि ड वर्ग पदांसाठी स्थानिक कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मिळाले. फुरसुंगी नगरपालिकेतील कर्मचारी कमतरतेचा प्रश्न तातडीने सोडविण्यावर भर देण्यात आला.
राज्यमंत्री मिसाळ आणि जिल्हाधिकारी डुडी यांनी, प्रशासकीय पातळीवर आवश्यक असलेल्या निधीची पूर्तता करण्यासोबतच नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. लवकरच सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री मिसाळ व जिल्हाधिकारी डुडी यांनी यावेळी दिले.
या बैठकीस नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त अभिषेक कृष्णा, उपसचिव अनिरुद्ध जेवळेकर, विभागीय सहायुक्त चंद्रकांत खोसे, जिल्हा सहयुक्त व्यंकटेश दुर्वास, सासवडचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, जेजुरीचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले,
फुरसुंगी-उरुळी देवाचीचे प्रशासक सचिन पवार, प्रसाद शिंगटे, सासवड आणि जेजुरीचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सदस्य, भाजपचे पदाधिकारी, यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.