सासवडमध्ये १९ आॅक्टोबरला पत्रकार संघाची ‘दिवाळी पहाट’
सासवड, ता. ११ : पत्रकार संघ सासवड शहर आयोजित ‘दिवाळी पहाट महोत्सव २०२५’ यावर्षी दिपोत्सवानिमित्त रविवारी (ता. १९) पहाटे ५. ३० वाजता आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. सासवड व परिसरातील वाचक वर्ग आणि रसिकांसाठी आयोजित या कार्यक्रमाचे हे सलग २० वे वर्ष आहे.
आळंदी येथील ‘सोहमनाद’ निर्मित आणि ज्योती श्याम गोराणे प्रस्तुत ‘जल्लोष सप्तसूरांचा जागर स्त्रीशक्तीचा’ हा सुरेल कार्यक्रम यावेळी सादर केला जाईल. यामध्ये भावगीते, भक्तिगीते, देशभक्तिपर गीते, चित्रपट गीते तसेच लोकसंगीतावर आधारित गीतांचा समावेश असून बहुतांश कलाकार महिला आहेत.
या कार्यक्रमाला माजी आमदार संजय जगताप यांची उपस्थिती राहणार असून भाजपचे पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर वढणे हे यंदाच्या या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. सासवडसह पुरंदर तालुक्यातील रसिक नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन सासवड शहर पत्रकार संघाच्या सदस्यांनी केले आहे.