सासवड परिसरात खुलेआम अवैध धंदे

सासवड परिसरात खुलेआम अवैध धंदे

Published on

सासवड, ता. १४ : पुरंदर तालुक्यात, विशेषतः सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे वाढले असून, यामुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अवैध मद्यविक्री, गांजा, जुगार, मटका आणि देहविक्री यांसारखे बेकायदेशीर धंदे खुलेआम सुरू असल्याचा आरोप नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाजवळील परिसरातील ​या अवैध धंद्यांवर कारवाई व्हावी, यासाठी आरपीआयचे विष्णू भोसले आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. उदयकुमार जगताप यांनी वारंवार निवेदने दिली आहेत. हॉटेल व्यावसायिकावरील हल्ल्याच्या निषेधार्थ भिवडी ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि सासवड पोलिस ठाण्यावर मोर्चाही काढला होता. मात्र, अनेक तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नाही. मतांच्या राजकारणामुळे या परिसराकडे कोणी लक्ष देत नसल्याचा आरोपही नागरिकांतून होत आहे.
या अवैध धंद्यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचा थेट सहभाग असल्याच्या गंभीर घटना उघडकीस आल्या आहेत. नुकताच, गुटख्याचा ट्रक सोडून दिल्याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याची बदली झालेल्या निरीक्षकासोबतचे संभाषण समाज माध्यमांतून प्रसारित झाले आहे. यापूर्वी, एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत सुरक्षारक्षकाला चिरडून ठार केल्याच्या घटनेत पुरावे नष्ट करण्यासाठी पोलिसांकडून अप्रत्यक्ष मदत मिळाल्याचीही चर्चा होती. तसेच, अवैध धंद्यात सहभाग असल्याच्या आरोपावरून काही महिन्यांपूर्वी दोन पोलिसांचे निलंबनही झाले होते.
​मागील काही दिवसांतील बेकायदेशीर हस्तक्षेप, अवैध धंद्यांवरील सुस्त कारवाई आणि गुन्ह्यांच्या तपासातील त्रुटींमुळे येथील पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी बदली केली आहे. या पार्श्वभूमीवर, काही दिवसांपूर्वी रुजू झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंग गौर आणि नवनियुक्त पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्यापुढे परिसरातील अवैध धंदे त्वरित थांबवून, पोलिस दलातील भ्रष्टाचाराच्या आरोपांना योग्य उत्तर देऊन कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्याचे मोठे आव्हान आहे. परिसरातील अवैध धंद्यांवर नवीन पोलिस अधिकारी कोणती कठोर भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

​वाहतूक कोंडीची समस्या कायम
​शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडीची समस्या अनेक वर्षांपासून आहे. पालिका आणि पोलिस प्रशासनाच्या याबाबत अनेकदा बैठका होऊनही सम- विषम तारखांनुसार वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयावर अद्यापही ठोस अंमलबजावणी झालेली नाही. शहरात दोन ठिकाणी वाहतूक नियंत्रण दिवे बसविले आहेत, मात्र अनेक चालक दुर्लक्ष करीत आहेत. त्यांना चाप बसला पाहिजे याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com