शिवाजी इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

शिवाजी इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

Published on


सासवड, ता. १२ : सासवड (ता. पुरंदर) येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलचे ऑपरेशन्स लेगसी : द हेरिटेज, आरमार ते सिंदूर या देशभक्तिपर संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन ८ ते १० जानेवारी दरम्यान संपन्न झाले. भारतीय सैन्यदलाचा ऐतिहासिक वारसा आणि शौर्याची गाथा या स्नेहसंमेलनातून प्रभावीपणे मांडण्यात आली.
या तीन दिवसीय स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य आणि समूहगीतांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार ते कारगील विजयापर्यंतच्या मोहिमा सादर केल्या. सैन्यदलातील शिस्त, त्याग आणि देशप्रेम विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून अनुभवताना पालक आणि मान्यवर भारावून गेले. यावेळी आदर्श विद्यार्थी, उत्कृष्ट क्रीडापटू आणि शिष्यवृत्ती धारकांचा गौरव करण्यात आला. लखनऊ येथील राष्ट्रीय स्काऊट-गाइड शिबिरात उत्कृष्ट दिग्दर्शनाबद्दल शिक्षिका शीतल बोरुडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
​या सोहळ्यासाठी सनदी अधिकारी डॉ राजेंद्र जगताप, नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, कर्नल सतेश हंगे, कर्नल सतिश रंदाळे, तहसीलदार विक्रम राजपूत, नगरसेवक सोपान रणपिसे, स्मिता जगताप, अर्चना जगताप, पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, अशोक जाधव यांसह पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्राचार्या रेणुकासिंह मर्चंट यांनी वार्षिक अहवाल सादर केला.
उपप्राचार्या सुषमा रासकर, उज्ज्वला जगताप, अमोल सावंत, स्वाती जगताप आणि सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्राजक्ता धसाडे, मनीषा लोखंडे, सुषमा वढणे, स्वाती भारती, हेमाली गोसावी, पुनम जाधव, शीतल बोरुडे, चित्ररेखा केसकर व कल्पना जगताप यांनी सूत्रसंचालन केले. आभार सुनिता नवले, मनीषा कुंजीर व माधुरी लोळगे यांनी मानले. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.

देशभक्ती अन् पर्यावरण संवर्धन
शाळेने केवळ करमणूक न करता देशभक्ती ही मुख्य संकल्पना ठेवून तीन दिवस देशभक्तीचा जागर करीत विद्यार्थ्यांवर शौर्याचे संस्कार केले.​ तसेच उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करताना त्यांना दिलेल्या भेटवस्तू नेण्यासाठी पर्यावरणपूरक कागदी पिशव्या देण्यात आल्या. यातून विद्यालयाने प्लास्टिक बंदी आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेशही दिला.


सासवड (ता. पुरंदर) : आरमार ते सिंदूर या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलनात देशभक्तिपर सादरीकरण करताना विद्यार्थी.

Marathi News Esakal
www.esakal.com