पुरंदरमध्ये नेत्यांची गावेच पिछाडीवर
सासवड, ता. १४ : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनी पुरंदर तालुक्यात अनेक राजकीय उलथापालथी समोर आणल्या आहेत. या निकालांचे सर्वात धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातील दिग्गज नेत्यांच्या स्वतःच्याच गावातून त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ‘क्रॉस वोटिंग’ झाल्याचे स्पष्ट होत आहे. केवळ मोजक्याच नेत्यांना आपला बालेकिल्ला राखण्यात यश आले आहे.
आमदार आणि शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्या यादववाडी गावातून वीर- भिवडी गटाचे शिवसेनेचे उमेदवार समीर जाधव यांना २४९; तर भाजपचे उमेदवार हरीभाऊ लोळे यांना ३२१ मते मिळाली. यामध्ये लोळे यांनी ७२ मतांची आघाडी घेतली. याप्रमाणेच याच यादववाडी बुथवर वीर गणातील शिवसेनेचे उमेदवार प्रविण जगताप यांना २२७; तर भाजपच्या सुधीर धुमाळ यांना ३८३ मते मिळाली. यातही भाजपने तब्बल १५६ मतांची आघाडी घेतली आहे.
माजी आमदार आणि भाजपचे नेते अशोक टेकवडे यांच्या जवळार्जुन गावातून नीरा- कोळविहिरे गट आणि कोळविहिरे गणातील भाजपचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले. गटात जवळार्जुनमध्ये राष्ट्रवादीच्या प्राजक्ता दुर्गाडे यांना ७२३ मते, शिवसेनेच्या भारती म्हस्के यांना ५४४ मते; तर भाजपच्या सीमा धायगुडे यांना केवळ १८० मते मिळाली. यामध्ये दुर्गाडे यांनी धायगुडेंपेक्षा ५४३ मतांची आघाडी घेतली. तर, कोळविहिरे गणात याच गावच्या शिवसेनेच्या उमेदवार शितल साळुंके यांनी ७९४ मते घेतली. येथे राष्ट्रवादीच्या स्मिता निगडे यांना ४८२; तर भाजपाच्या सीमा म्हस्के यांना अवघी १६१ मते मिळाली. येथे जवळार्जुनच्या साळुंके यांनी म्हस्के यांच्यापेक्षा तब्बल ६३३ मतांची आघाडी घेतली.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांच्या पांडेश्वर गावातही मतांची तशीच आकडेवारी दिसली. येथे बेलसर- माळशिरस गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार गौरव कोलते चक्क पाचव्या क्रमांकावर फेकले गेले. येथे भाजपचे अजय इंगळे यांना ४४६, काँग्रेसचे दत्ता झुरंगे यांना २१४, शिवसेनेचे रमेश इंगळे यांना १९७, ठाकरे शिवसेनेचे अमोल कामठे यांना १७६; तर राष्ट्रवादीचे गौरव कोलते यांना १५८ मते मिळाली. या गावातून अशीच परिस्थिती माळशिरस गणाच्या मतातही दिसली. भाजपचे माउली यादव यांना ४५०, शिवसेनेचे शरद यादव यांना ३१५; तर राष्ट्रवादीच्या अजिंक्य कड यांना २४४ मते मिळाली. यातही राष्ट्रवादीपेक्षा भाजपने २०६ मतांची आघाडी घेतली.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख उमेश गायकवाड यांच्या भिवडी गावातूनही काहीशी अशीच स्थिती आहे. भिवडी गणातील भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार याच गावातील होते. त्याचाही परिणाम मतांमध्ये झाला. वीर- भिवडी गटासाठी भिवडीतून भाजपच्या हरीभाऊ लोळे यांना ९७८; तर शिवसेनेच्या समिर जाधव यांना ७२९ मते मिळाली. यामध्ये लोळे यांनी २४९ मतांची आघाडी घेतली. तर, भिवडी गणात भाजपाच्या सायली शिंदे यांनी १०३३ तर शिवसेनेच्या पुजा मोकाशी यांनी ७९० मते घेतली. यात शिंदे यांनी २४३ मतांची आघाडी घेतली.
धुमाळ, कोलते यांना दिलासा
या निकालात थोडासा दिलासा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ यांच्या जेऊर गावातून दिसला. वीर- भिवडी गटाचे राष्ट्रवादीचे पुष्कराज जाधव यांना जेऊरमधून ७४३ मते, शिवसेनेचे समीर जाधव यांना ३८९; तर भाजपच्या हरीभाऊ लोळे यांना ३२२ मते मिळाली. घड्याळाने येथून ३५४ मतांची आघाडी घेतली. तर, जेऊरमधूनच वीर गणासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम धुमाळ यांना ८६१, शिवसेनेचे प्रवीण जगताप यांना ४४९; तर भाजपच्या सुधीर धुमाळ यांना २४२ मते मिळाली. उत्तम धुमाळ यांना ४१२ मतांची आघाडी त्यांच्या गावातून मिळाली. याप्रमाणेच बेलसर- माळशिरस गटात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांच्या पिसर्वे गावातून राष्ट्रवादीचे उमेदवार गौरव कोलते यांना १४७६ मते, भाजपचे अजय इंगळे यांना २७२ मते, शिवसेनेचे रमेश इंगळे यांना २४५; तर काँग्रेसच्या दत्ता झुरंगे यांना १९५ मते मिळाली. येथे कोलते यांनी १२०४ मतांची आघाडी घेतली. तर, बेलसर गणासाठी झालेल्या मतदानात पिसर्वे येथून राष्ट्रवादीचे नीलेश जगताप यांना ९५५ मते, याच गावातील काँग्रेसच्या कुशाल कोलते यांना ७३३ मते, शिवसेनेच्या माणिक निंबाळकर यांना ३४४ मते; तर भाजपच्या कैलास जगताप यांना २४४ मते मिळाली. येथे राष्ट्रवादीने पिसर्वे गावातील काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा २२२ मतांची आघाडी घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

